बाळासाहेबांच्या शिकवणीचा शिवसेनेला पडला विसर?

खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विरोधकांना कोरोना काळात राजकारण बाजूला ठेवून एकत्र लढू, असे आवाहन करत असतानाच त्यांच्या आवाहनाला त्यांचे शिवसैनिकच हरताळ फासत आहेत.

८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण… ही खरंतर हिंदुहृहयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण. बाळासाहेबांनी आपल्या भाषणात देखील याचा अनेकदा उल्लेख केला. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला बाळासाहेबांच्या या विचारांचा विसर पडला की काय?, असा प्रश्न आता विरोधक विचारू लागले आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विरोधकांना कोरोना काळात राजकारण बाजूला ठेवून एकत्र लढू, असे आवाहन करत असतानाच त्यांच्या आवाहनाला त्यांचे शिवसैनिकच हरताळ फासत आहेत. मनसे नेते अखिल चित्रे यांनी हा मुद्दा ट्विटवरुन उपस्थित केला असून, लसीकरण केंद्रांबाहेर शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या बॅनरबाजीवर मनसेने निशाणा साधला आहे.

ही बॅनरबाजी का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि खुद्द परिवहन मंत्री अनिल परब ज्या वांद्रे पूर्व परिसरात राहतात, तेथेच ही बॅनरबाजी करण्यात आली. त्यावरच आता मनसेने बोट उचलले आहे. विशेष म्हणजे वांद्रे पूर्व येथील पीडब्लूडी कम्यूनिटी हॉल येथे १८ ते ४४ वयोगटासाठी दोन दिवसांपूर्वी पालिकेने लसीकरण केंद्र सुरू केले. मात्र या लसीकरण केंद्राबाहेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांचे फोटो असलेला बॅनर प्रवेशद्वारावर लावण्यात आला. मनसेने यावर आक्षेप घेतल्यानंतर तो  बॅनर काढण्यात आला. पण आज पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसह हा फलक पुन्हा लावण्यात आला आहे.

(हेही वाचाः परिवहन मंत्र्यांचे ‘ते’ पत्र म्हणजे दिशाभूल?)

लस मातोश्रीवर बनली का?

या सर्व प्रकारावर मनविसेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी आवाज उठवला असून, हे बॅनर पाहून ही लस नेमकी कोणी बनवली आहे, असा प्रश्न पडतो. लसीकरण केंद्राबाहेर असे बॅनर लावल्यामुळे, ही लस शिवसैनिकांनी बनवली आहे का की मातोश्रीवर बनली आहे, असा सवाल देखील अखिल चित्रे यांनी यावेळी उपस्थित केला. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: म्हणतात की राजकारण करू नका, पण त्यांचे कार्यकर्ते काही काम न करता राजकारण करत आहेत. हे बॅनर लावायला तुमच्या काय शाखेचे उद्घाटन आहे की, तुमच्या शाखेत सत्यनारायणाची पूजा आहे, असा संतप्त सवाल देखील अखिल चित्रे यांनी उपस्थित केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here