उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी त्यांना राज्यभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या शुभेच्छांमध्ये उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा न करता केवळ माजी मुख्यमंत्री असा केला आहे. त्यामुळे यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा होत असताना आता मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या शुभेच्छांनी तर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
खोपकरांच्या खोचक शुभेच्छा
हिंदू जननायक अखंड महाराष्ट्राचे भाग्यविधाते आदरणीय राज साहेब ठाकरे यांचे चुलत भाऊ उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, अशा खोचक शब्दांत ट्वीट करत अमेय खोपकर यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अमेय खोपकर यांनी याआधी सुद्धा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांमधूनही खोपकर यांनी ठाकरेंवर निशाणा साधला असल्याचे बोलले जात आहे.
हिंदू जननायक अखंड महाराष्ट्राचे भाग्यविधाते आदरणीय राज साहेब ठाकरे यांचे चुलत भाऊ उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!🙏🏽🙏🏽🙏🏽
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) July 27, 2022
पवारांनी दिल्या शुभेच्छा
दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शुभेच्छांमध्ये उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा करण्यात आला नसल्यामुळे याची चर्चा होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री असा करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Join Our WhatsApp Community