राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचा सपाचा लावला आहे. अशातच गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली. या भेटीचा एक फोटो शेअर करत मनसे नेते अमेय खोपकर यांनी सूचक ट्वीट केले आहे.
विचारांचा वारसा परफेक्ट ‘क्लिक’
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीचा हा फोटो आहे. यामध्ये हे दोघेही नेते एकमेकांना हस्तांदोलन करत आहेत. तर मागे प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र आहे. हा फोटो शेअर करत अमेय खोपकर यांनी सूचक ट्वीट केले आहे. ‘प्रबोधनकार ते बाळासाहेब ते राजसाहेब. विचारांचा वारसा परफेक्ट क्लिक झालाय. ‘एक’ साहेब आणि ‘एक’नाथ साहेब.’, असे कॅप्शन अमेय खोपकर यांनी या फोटोला दिले आहे.
प्रबोधनकार ते बाळासाहेब ते राजसाहेब.
विचारांचा वारसा परफेक्ट 'क्लिक' झालाय.
'एक' साहेब आणि 'एक'नाथ साहेब.#श्रीगणेशा #बाप्पा_मोरया #RajThackeray #SharmilaThackeray #MNS pic.twitter.com/3uO7KbVolm— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) September 1, 2022
मुंबई महापालिकेसाठी मोर्चेबांधणी?
दरम्यान, आधी भाजप नेत्यांनी आणि आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मनसे-भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले असले तरी यामागे नक्कीच राजकीय संकेत असल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community