एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयांमध्ये बदल करायला सुरुवात केली आहे. मेट्रो-3 कारशेड कांजुरमार्ग ऐवजी आरेमध्येच बांधण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला शिवसेनेकडून विरोध होत असतानाच आता मनसेनेही या वादात उडी घेतली आहे. मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी शिंदे सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
अमित ठाकरेंची फेसबूक पोस्ट
अमित ठाकरे यांनी एक फेसबूक पोस्ट करत आरेमधील कारशेडच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. मेट्रो कारशेड आरेतच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुण-तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होतं.
आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. आपलं पर्यावरण उद्ध्वस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं. नवे मुख्यमंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती अमित ठाकरे यांनी आपल्या फेसबूक पोस्टद्वारे शिंदे सरकारला केली आहे.
उद्धव ठाकरेंचा विरोध
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिंदे सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्यात आधी मी त्या निर्णयाला स्थगिती दिली होती. मुंबईच्या विकासाच्या आड येण्याचा माझा विचार नव्हता, कांजुरमार्गचा पर्याय मी त्यावेळी सुचवला. त्यामुळे मी हात जोडून विनंती करतो की ,आरेत कारशेड करण्याचा निर्णय आपण रेटू नका. माझा राग मुंबईवर काढू नका, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारकडे केली आहे.
Join Our WhatsApp Community