मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र व मनसे नेते अमित ठाकरे हे आता चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. गुरुवारी त्यांनी फेसबूक पोस्ट करत खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन सत्ताधा-यांवर टीका केली असतानाच, शुक्रवारी त्यांनी खड्ड्यांतून मार्ग काढण्याऐवजी चक्क लोकल ट्रेनची वाट धरली.
राज्यातील रस्त्यांवर सर्वत्र असलेल्या खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुळे लागणारा वेळ यामुळे अमित ठाकरे यांनी लोकल प्रवास करायचे ठरवले. कल्याण-डोंबिवलीतील पदाधिका-यांच्या बैठका घेण्यासाठी त्यांनी दादर ते डोंबिवली असा लोकल प्रवास केला आहे.
(हेही वाचाः आता ‘अमित’ गल्लीत टेन्शन वाढवणार)
सत्ताबदलाशिवाय मुंबईकरांना पर्याय नाही
ज्यांना काहीच दिवसांत खड्डे पडतात असे रस्ते बनतातच कसे, असा सवाल त्यांनी सत्ताधा-यांना विचारला आहे. नाशिकमध्ये तर खड्डे शोधूनही सापडत नाहीत. आम्ही नुसते बोलून नाही तर करुन दाखवले. त्यामुळे मुंबईकरांना जर खड्डेमुक्त रस्ते हवे असतील तर सत्ताबदल हा एकमेव मार्ग असल्याचे स्पष्ट मत अमित ठाकरे यांनी यावेळी मांडले.
त्यांचा विचार कोण करणार?
खड्ड्यांमुळे होणा-या वाहतूक कोंडीतून वेळ वाचावा यासाठी मी आज लोकल प्रवास करत आहे. पण ज्यांना रोज या रस्त्यांवरुन ये-जा करावी लागते त्यांना किती त्रास होत असेल? त्यांचा विचार कोणी का करत नाही?, असा सवालही त्यांनी केला आहे.
(हेही वाचाः ‘शिवसेना’ लय भारी, ‘खड्ड्यात’ गेली जबाबदारी! मुंबईकरांचे रोजचे हाल दाखवणारा व्हिडिओ)
कसा आहे दौरा?
नाशिक दौ-यानंतर आता अमित ठाकरे हे कल्याण-डोंबिवलीचा दौरा करत आहेत. 1 ते 3 ऑक्टोबर असा हा तीन दिवसीय दौरा असणार आहे. तसेच हा दौरा निवडणुकीसाठी नसून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पक्षाकडून काय पावलं उचलली जातात, याबाबत या दौ-यात चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फेसबूक पोस्ट करत टीका
रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे होणारे ट्रॅफिक जॅम, अपघात, वाया जाणारे इंधन यामुळे सर्वांच कंबरडं मोडलंय, पण सत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काही देणंघेणं नाही, असा आरोप अमित ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन खड्डेविरोधी आंदोलनं करतोय. खड्ड्यांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल, अशी झणझणीत टीका फेसबूक पोस्ट करत अमित ठाकरे यांनी शुक्रवारी केली होती.
(हेही वाचाः खड्ड्यांवरुन शेलारांची शिवसेना आणि सुप्रियाताईंवर जोरदार टीका)
Join Our WhatsApp Community