मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाण्यातील हाय व्होल्टेज सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. या उत्तरसभेत राज ठाकरे कोणाला प्रत्युत्तर देणार याची उत्सुकता सर्वांना आहे. याच सभेच्या मंचावरुन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचा समाचार घेतला आहे. आम्हाला बोलण्यापेक्षा तुमचा इतिहास तपासून बघा, वसंतसेना ते आताची शरदसेना असा तुमचा प्रवास आहे, असा टोला देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला आहे.
वसंतसेना ते शरदसेना
गुढीपाडव्याला राज ठाकरे यांची शिवतीर्थावर न भूतो न भविष्यती अशी सभा झाली. संपूर्ण महाराष्टाचं त्या सभेकडे लक्ष होतं. त्यावेळी राज ठाकरेंच्या परखड विचारांमुळे अनेक जण घायाळ झाले. हल्ली इतिहास माहीत नसणारे काही नेते पुण्याईवर बोलायला लागले आहेत. संपलेल्या पक्षावर आपण बोलत नाही, असे विधान आदित्य ठाकरे यांनी केले. पण शिवसेनेचा इतिहास तपासून घ्या, या सेनेला वसंतसेना म्हटलं जायचं. वसंतरावांनी शिवसेनेला नवसंजीवनी दिली होती. तेव्हाची वसंतसेना आणि आताची शरदसेना असा शिवसेनेचा प्रवास आहे, त्यामुळे तुम्ही आम्ही कोणाची कुठली टीम आहोत, ते आम्हाला सांगू नका, अशा शब्दांत देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
(हेही वाचाः भाजपसहित सगळ्यांची ऑफर होती! वसंत मोरेंची जाहीर कबुली )
‘ढ’ लोकांची ‘ढ’ सेना
राज ठाकरेंची आतापर्यंतची प्रत्येक भूमिका ही ठाम आहे. जे चुकलं ते बोलायची धमक आमच्यात आहे. निवडणुकीपूर्वी एका पक्षाशी युती करायची आणि नंतर दुस-याच्या मांडीत जाऊन बसायचं, हे आम्ही करत नाही.शिवसेना ही ‘ढ’ लोकांची ‘ढ’ सेना आहे, अशी खोचक टीका देशपांडे यांनी केली आहे.
बाळासाहेबांचे विचार संपवले
शिवसेनेने भगवा रंग आता बाजूला ठेवावा आणि आता त्याजागी वेगळा रंग परिधान करावा. आम्ही संपलो नाही, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुम्ही संपवले आहेत. त्यामुळेच हनुमान चालिसेमुळे तुम्हाला डिवचायला होतं. त्यामुळे आता शिवसेना संपली आहे, हे आता मुंबई महापालिका निवडणुकीत दिसेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.
(हेही वाचाः आधी सभा साहेबांची, मग लग्न घरातले! वसंत मोरे ठाण्यात पोहचले)
Join Our WhatsApp Community