वसई – विरार महापालिकेने त्यांच्या हद्दीतील गोविंदा पथकांचा अपघात विमा उतरवला आहे. त्या धर्तीवर,ठाणे महापालिकनेही शहरातील गोविंदा पथकाचा अपघात विमा उतरवावा. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे – पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे मनपा आयुक्त विपीन शर्मा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, मुंबई, नवी मुंबई महापालिकासोबत राज्यातील सर्व बड्या महापालिकानी पुढाकार घेऊन अशा प्रकारे गोविंदा पथकांचा विमा उतरवावा, असेही अविनाश जाधव यांनी बोलताना सांगितले.
(हेही वाचा – दादर-माहिम,धारावी आणि वडाळ्याच्या शिवसेना विभागप्रमुखपदी महेश सावंत; पक्षातील निष्ठावान शिवसैनिकांवर मात्र पक्षाचा अविश्वास)
कोरोनाचे सावट सरल्याने यंदा सरकारने सर्व उत्सव निर्बंधमुक्त केले आहेत. या पार्श्वभूमीवर दहीहंडीची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या ठाणे नगरीलाही दहीहंडीचे वेध लागले आहे. यंदा १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या दहीहंडीसाठी गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहचला असून गोविंदा मंडळांचा सरावही जोमाने सुरु आहे. कोरोना काळात दोन वर्ष गणेशोत्सव आणि दहीहंडी सारख्या सार्वजनिक सणांवर आलेल्या निर्बंधामुळे मराठी मनावर मरगळ आली होती. परंतु यावर्षी मात्र सर्व सण जोषात साजरा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याने गणेश भक्त आणि गोविंदांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
महापालिकेच्या निर्णयाने गोविंदा सुखावले
या अनुषंगाने यंदा दहीहंडी उत्सवाकरीता वसई विरार महापालिकेने घेतलेल्या एका निर्णयाने गोविंदा सुखावले आहेत. वसई विरार महापालिकेने आपल्या मनपा क्षेत्रातील सर्व गोविंदांचा अपघाती विमा उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून ठाण्यात देखील अनेक गोविंदा पथके आहेत,याच धर्तीवर ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी एक पाऊल पुढे टाकत गोविंदा पथकातील बाळगोपाळांचे विमा उतरवावेत. अशी मागणी अविनाश जाधव यांनी पत्राद्वारे केली आहे. किंबहुना, वसई विरारच का, ठाणे, मुंबई, नवी मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वच महापालिकानी गोविंदाचे विमा उतरविले पाहिजेत. अशी मागणी त्यांनी केली. या आधी जायबंदी झालेल्या गोविंदाच्या औषधोपचाराचा सर्व खर्च शासनाने करावा, अशी मागणी देखील त्यांनी केली. दहीहंडी हा सण आता महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून त्याला आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त झाले असल्याने पालिका प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत या सणात खारीचा वाटा उचलावा, असेही अविनाश जाधव म्हणाले.
नेमके काय केले वसई- विरार मनपाने
दहीहंडी सणांमधील जोखीम व धोका विचारात घेऊन गोविंदा पथकात भाग घेणाऱ्या व्यक्तीचे, त्याचे मंडळ किंवा दुर्घटना घडल्यास त्या संबंधीत सदर दुर्घटनाग्रस्त व्यक्तीस संरक्षण देण्यासाठी वसई विरार महापालिकेने गोपाळकाला अपघात विमा योजनेस १ ऑगस्ट रोजी मंजुरी दिली आहे. यासाठी मंडळांनी आपल्या नोंदणीकृत मंडळाच्या पत्रावर गोविंदाचा पूर्ण तपशील व आधार कार्डची छायाकित प्रत जोडावी. या योजनेत १२ वर्षाखालील गोविंदांचा विमा काढला जाणार नसुन नोंदणीसाठी १६ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
Hi मागणी करणे योग्य नाही महापालिकांनी का करावी ही मागणीच करणे योग्य नाही