1 मेला महाराष्ट्र दिनी होणा-या राज ठाकरे यांच्या सभेची संपूर्ण राज्यात हवा आहे. शीवतीर्थ आणि ठाण्यात राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभांमध्ये आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर या सभेत राज ठाकरे काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे औरंगाबादमधील बाळासाहेबांच्या सभेचा रेकॉर्ड मोडू शकत नाहीत, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात येत आहे. त्याला आता मनसेकडून उत्तर देण्यात आले आहे.
बाळासाहेबांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी राज ठाकरेंची ही सभा नाही, बाळासाहेब बाळासाहेब होते, त्यांच्याच तालमीत राज ठाकरे तयार झाले आहेत, असं विधान मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
(हेही वाचाः बेल की जेल? राणा दाम्पत्याच्या जामिनावर होणार शनिवारी सुनावणी)
बाळासाहेबांच्या तालमीत राज ठाकरे तयार झाले
कोणाचा रेकॉर्ड मोडायला कोणाची सभा नसते. लोक सभेत विचारांचं सोनं लुटायला येतात. बाळासाहेब हे बाळासाहेब होते, त्यांच्याच तालमीत राज ठाकरे तयार झाले आहेत. त्यामुळे रेकॉर्ड मोडायचा विषय येत नाही. हर्षवर्धन जाधव मारहाण प्रकरणी राज ठाकरे यांची याच मैदानात मोठी सभा झाली होती. त्यावेळी रेकॉर्ड मोडायचा मुद्दा आला नाही.
बाळासाहेबांची छबी दिसते
राज ठाकरेंच्या आक्रमक पवित्र्यामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली की नाही, हे मला माहीत नाही.
पण राज ठाकरेंमध्ये आम्हाला बाळासाहेबांची छबी दिसत आहे, अशी भावना आता लोकांच्या मनात आहे. त्यामुळे तो प्रवास आता राज ठाकरे करतील, असाही विश्वास बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे.
(हेही वाचाः योगी आणि भोगीबाबत मतपरिवर्तन कसे झाले? हा संशोधनाचा विषय! राऊतांचा राज ठाकरेंना टोला)
तर आम्ही काही करू शकत नाही
आम्ही पोलिसांनी घालून दिलेल्या अटी-शर्तींचं पालन करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. सभेसाठी 15 हजार लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण पोलिसांनी या सभेला परवानगी देण्यास उशीर केला आहे. त्यामुळे या सभेबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे. लोक कुठून किती येतील ते आमच्या हातात नाही, असंही नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
Join Our WhatsApp Community