बाळा नांदगांवकर यांचा सरकारला सल्ला! म्हणाले, सरसकट मोफत लस देण्यापेक्षा…

राज्य सरकार ने सरसकट लस मोफत देण्यापेक्षा मोफत आणि विकत दोन्हीसाठी लसीकरण केंद्रावर व्यवस्था करावी.

116

देशभरात 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लस मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेच्या नियोजनासाठी देशातील सर्वच राज्यांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्रातही यासाठी तयारी केली जात असून, राज्य सरकार सर्वांना मोफत लस देण्याच्या विचारात आहे. पण मोफत लस देण्याच्या मुद्द्यावरुन मनसेचे प्रवक्ते आणि माजी आमदार बाळा नांदगांवकर यांनी ट्वीट करत राज्य सरकारला एक सल्ला दिला आहे.

काय म्हणाले नांदगांवकर?

सरसकट सर्वांना मोफत लस देण्यावरुन राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत 28 एप्रिल रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे. पण राज्य सरकारने सरसकट मोफत लस देण्यापेक्षा, मोफत आणि विकत अशी दोन्हीसाठी लसीकरण केंद्रावर व्यवस्था करावी. जेणेकरुन ज्यांना लस विकत घेणे शक्य आहे, ते पैसे देऊन लस घेऊ शकतात. असा सल्ला बाळा नांदगांवकर यांनी सरकारला दिला आहे. तसेच जनतेला यासाठी आवाहन केल्यास, राज्यातील जनता नक्कीच याला चांगला प्रतिसाद देतील. ज्यांना शक्य आहे ते लोक मोफत लस घेणे टाळतील आणि सरकारला सहकार्य करतील, असा विश्वासही नांदगांवकर यांनी ट्वीटद्वारे व्यक्त केला आहे.

(हेही वाचाः लसीकरणाआधी मनसेचे मुख्यमंत्र्यांना पत्र, लसीकरणात येणाऱ्या अडचणींकडे वेधले लक्ष!)

याआधीही मनसेकडून मुख्यमंत्र्यांना पत्र

लसीकरणाच्या तुटवड्यावरुन राज्यात गोंधळ सुरू असताना, 1 मे पासून जर 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू झाले, तर अधिक अडचणी येऊ शकतात, असे मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे कळवले होते. त्यामुळ सध्या लसीकरणासाठी असलेली व्यवस्था वाढवून ती अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे या पत्रात मनसेकडून सांगण्यात आले होते.

मोफत लसीकरणावरुन आघाडीत बिघाडी

मोफत लस देण्यावरुन राज्य सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे म्हटले जात आहे. राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्र्यांनी याबाबतचा निर्णय जाहीर करण्याआधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे याबाबत आघाडी सरकारमधील काँग्रेसचे नेते नाराज झाले होते. मुख्यमंत्र्यांनी निर्णय जाहीर करण्यापूर्वी, याबाबतची माहिती देणं, हे चूक असल्याचे काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले होते. मोफत लसीकरणाच्या श्रेयाची लढाई सुरू आहे, ती योग्य नाही. हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केला पाहिजे. कुणीही श्रेयासाठी घोषणा करणे योग्य नाही, असेही थोरात म्हणाले होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्वीट करुन मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर हे ट्वीट त्यांनी डिलीट केले होते. कॅबिनेट बैठकीत मोफत लसीकरणाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचाः आता मोफत लसीवरुन ठाकरे सरकारमध्ये ‘रस्सीखेच’!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.