नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नी संजीवनी काळे यांनी शारिरीक, मानसिक छळवणूक करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमांखाली गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हा दाखल होऊन सहा दिवस उलटून गेले, तरी नवी मुंबई पोलिसांनी अद्याप गजानन काळेंना अटक केली नाही. आता खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गजानन काळेंना अटक करण्यासाठी पोलिसांना आदेश दिले आहेत. महाविकास आघाडीमधील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील सोमवारी पोलिस आयुक्तालयाचा आढावा घेण्यासाठी आले असता, त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न महिलांनी केला. यावेळी त्यांना अडवण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने पोलिस आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. अखेर गृहमंत्र्यांनी महिलांच्या शिष्टमंडळाला भेटून परिस्थिती समजून घेतली.
(हेही वाचाः मनसेच्या गजानन काळेंचे भाजपा वाढवणार टेन्शन!)
काय आहेत काळेंच्या पत्नीचे आरोप?
महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात खुद्द त्यांच्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचार आणि अनैतिक संबंध असल्याचे म्हणत पोलिसांत तक्रार दिली आहे. नवी मुंबईच्या नेरुळ पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. लग्नानंतर १५ दिवसांनी गजानन काळे यांनी किरकोळ घरगुती कारणावरुन भांडण करुन माझा सावळा रंग व माझी जात यावरुन मला टोमणे मारू लागला, जातीवाचक शिवीगाळ करू लागला. तू सावळी आहेस, तुझी जात वेगळी आहे तरी देखील मी तुझ्याशी लग्न केले, माझी चूक झाली. तुझ्या वडिलांची पोस्ट बघून मी तुझ्याशी लग्न केले. परंतु त्याचा मला काही एक फायदा झाला नाही. यावरुन तेव्हा आमच्या दोघांमध्ये भांडण झाले. त्यावेळी गजाननने मला मारहाण केली होती. तेव्हा मी माझ्या आई-वडिलांना फोन केला असता ते माझ्या घरी आले. या वादानंतर मी माहेरी निघून जाणे पसंत केले. मात्र काही दिवसांनी समजूत काढून पुन्हा वाद होणार नाही, असे पटवून त्याने पुन्हा मला घरी आणले.
(हेही वाचाः राज ठाकरेंनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे… पवारांचा सल्ला)
गजानन काळेचे अनैतिक संबंध
पुन्हा वाद होऊ लागल्याने शारीरिक व मानसिक त्रास झाल्याने दादर येथे मी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेत होते. वर्षभर हे उपचार सुरू होते. दरम्यान, गजानन याचे इतर स्त्रियांसोबत अनैतिक संबंध असल्याची खात्री फोनवरील संभाषणवरुन झाली होती. पण दुसरीकडे समाजात त्याची प्रतिमा चांगली राहावी व लोकांना वाटावे कुटुंबवत्सल आहे, हे भासवण्यासाठी कौटुंबिक कार्यक्रम, लग्नाचा वाढदिवस, मुलाचा वाढदिवस अशा कार्यक्रमांचे फोटो मला जबरदस्ती सोशल मीडियावर पोस्ट कराव्या लागत होत्या. एवढंच नाही तर गजानन काळे म्हणतो की, त्याच्या सात पिढ्या बसून खातील एवढा पैसा त्याच्याकडे आहे. मात्र, असे असताना देखील तो मागील दोन महिन्यांपासून घर खर्च देत नव्हता. अशावेळी मी माझ्या मुलाचा सांभाळ कसा करावा? त्यामुळे आज मी नाईलाजास्तव गजानन विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे संजीवनी काळे म्हणाल्या होत्या.
Join Our WhatsApp Community