महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त शुभेच्छा द्यायला येताना कुणीही पुष्पगुच्छ आणि मिठाई घेऊन येऊ नका. तर येताना एखादं झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य घेऊन या, असं आवाहन त्यांनी चाहते आणि कार्यकर्त्यांना केलं आहे. या आशयाची पोस्ट त्यांनी फेसबुकवर टाकली आहे.
राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘दरवर्षी १४ जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात. पण या वर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणालं, ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या या विनंतीचा नक्की मान ठेवालं याची मला खात्री आहे. सकाळी ८:३० ते १२ या वेळेत मी उपस्थित असेन. तेव्हा भेटूया १४ जूनला.’
(हेही वाचा – न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका, वारकऱ्यांची सुरक्षा महत्वाची – देवेंद्र फडणवीस)
मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जनसंपर्क वाढावा म्हणून प्रत्येक शहरात नाका तिथे शाखा हा उपक्रम सुरू करण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना याआधीच दिल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community