तुम्ही जिम सुरु करा – राज ठाकरे

222

‘तुम्ही जिम सुरु करा, बघू काय होतं ते असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिम व्यावसायिक आणि बॉडीबिल्डर्सना दिला आहे. राज्यातील व्यायामशाळा पुन्हा सुरु कराव्यात या मागणीसाठी जिम व्यायसायिक आणि बॉडिबिल्डर्सनी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर भेट घेतली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे

जिम व्यावसायिक आणि बॉडीबिल्डर्स यांची भेट घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, ‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझं बोलणं झालं आहे. त्यांचंही म्हणणं आहे की, जिम सुरु झालं पाहिजे. आता मी सांगतो, जिम सुरु करा, ज्याला यायचं आहे, तो जिमला येईल. बघू काय होतं ते. ‘किती दिवस लॉकडाऊनमध्ये काढणार आहात? प्रत्येकाने आपली काळजी घ्या, प्रत्येकाची काळजी घ्या. केंद्राने जारी केलेल्या गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्या पाळून काळजी घ्या.’ असे आवाहनही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.

फिजिकल डिस्टंन्सिंगबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘गोल्फ आणि टेनिस यापेक्षा जास्त फिजिकल डिस्टन्स काय असू शकतो? मधू इथे आणि चंद्र तिथे. मी खेळायला सुरुवात केली, काय होतंय बघूया.. माझं तुम्हाला म्हणणं आहे काय कारवाई करणार? मार्केट सुरु आहेत सगळे. हा सगळा मूर्खाचा बाजार सुरु आहे. बाकी सगळ्या गोष्टी सुरु आहेत.’

राज्याला काही वेगळी अक्कल आहे का?

दरम्यान यावेळी राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली असून, ‘केंद्र सरकार सांगत आहे की, जिम सुरु करा, विमानतळ सुरु करा. राज्य म्हणतयं, आम्ही नाही करणार, मग राज्याला काही वेगळी अक्कल आहे का?’ असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणाही साधला आहे. तसेच पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘आधी मला सांगा की, जिम सुरु केल्यानंतर तुम्ही कशी काळजी घेणार?’ राज ठाकरेंच्या या प्रश्नावर उत्तर देत जिम व्यावसायिकांनी आपली काळजी घेण्यासाठी उपाययोजना केल्याचं सांगत ‘कार्डिओ बंद करणार असून सॅनिटायझेशनही करणार आहोत. तसेच एक तासाची एक बॅच अशा पद्धतीने जिम सुरु करण्याचा मानस असल्याचं सांगितलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.