आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने अॅक्शन मोड ऑन केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आजपासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी नाशिकसह पुण्याचा दौरा केला होता. मात्र काही कारणास्तव त्यांनी या दौऱ्याला ब्रेक लावत आज पुन्हा एकदा नाशिकपासून महाराष्ट्र दौऱ्याचा श्री गणेशा केला आहे. राज्यात मनसेला पुनरुज्जीवित करण्यासाठी राज ठाकरेंनी रणनीती आखली असून या दौऱ्यादरम्यान, राज ठाकरे मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे.
राज ठाकरे नाशिक दौऱ्यासाठी रवाना
मिळालेल्या माहितीनुसार, आज राज ठाकरे नाशिक दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. सकाळी १० वाजता नाशिक मध्यवर्ती कार्यलयात राज ठाकरे पोहचतील. त्यांच्या उपस्थितीमध्ये काही कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. सध्या मुंबई , पुणे आणि नाशिककडे मनसेनं जास्त लक्ष केंद्रीत केलं आहे. नाशिक दौऱ्यानंतर लगेच औरंगाबादच्या दिशेने रवाना होणार आहेत. इतकेच नाहीतर राज ठाकरे मराठवाडा दौराही करणार आहेत.
(हेही वाचा – मोदींच्या हस्ते आज वाराणसीत काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन!)
मनसे काय रणनीती आखणार
सर्वच राजकीय पक्ष राज्यात आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलीच कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये मनसे देखील मागे न राहता मनसेकडूनही जोरदार तयारी सुरु केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करणार आहेत. राज्यभरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये दौऱ्यांचं नियोजन केले आहे. महाराष्ट्रात मनसेचा एकच आमदार आहे. नगरसेवक आणि झेडपी सदस्य संख्याही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. तर, मुंबई पालिकेत केवळ 1 नगरसेवक राज ठाकरेंसोबत आहे. पुण्यातही पहिल्या निवडणुकीत 27 नगरसेवक असलेला आकडा आता दोन अंकीही राहिलेला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे सज्ज झाली असून मनसे काय रणनीती आखणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.