मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी वेगात गाडी चालवून महिला पोलिसाला पडल्याच्या प्रकरणी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे दोघे फरार आहेत. त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर बुधवारी, ११ मे रोजी सुनावणी होणार आहे.
संदीप देशपांडेंच्या चालकाला अटक
मागील तीन दिवसांपासून संदीप देशपांडे आणि संतोष धुरी फरार आहेत. त्यांच्या अटकपूर्व जामीनासाठी मनसेने धावाधाव सुरू केली आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी देशपांडे आणि धुरी यांचा ठिकठिकाणी शोध सुरू केला आहे. उरण, कर्जत, मुंबई येथे त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. मशिदीवरील भोंगा आंदोलन सुरु होण्याआधी दररोज वल्गना केलेल्या, पण ४ मे रोजी प्रत्यक्षात पोलीस समोर दिसताच हातातून सुटून फरार झालेल्या मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या चालकाला शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थसमोर पोहोचले होते. त्यावेळी देशपांडे पोलिसांच्या हातातून गाडीत बसून सुसाट वेगात फरार झाले होते. यावेळी महिला पोलीस कर्मचारी जमिनीवर पडून जखमी झाली होती. पोलिसांनी संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष साळी आणि ड्रायव्हर यांच्या विरोधात कलम ३०८, ३५३, २७९ आणि ३३६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आता पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असताना मनसेने त्यांच्या अटकपूर्व जामीनासाठी धावाधाव सुरू केली आहे.
Join Our WhatsApp Community