‘केवळ दावा सांगून काही होत नसतं’, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मनसेचं उत्तर

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा गेल्या अनेक वर्षांपासून पेटला असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्याच्या जतमधील गावांवर दावा सांगितला आहे. त्यावरुन आता नवा वाद सुरू झाला आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळून लावला असतानाच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील यावरुन कर्नाटक सरकारवर निशाणा साधला आहे.

निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती

सीमाभागात जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. पण कुणीही असा दावा ठोकल्याने काही होत नाही. गेल्या अेक वर्षांपासून आपणही बेळगाव वर दावा सांगत आहोत, पण अजूनही तो प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे हा केवळ निवडणुकीच्या काळात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. असे दावे ठोकून काही होत नसतं आणि या गोष्टींचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सक्षम आहे.

(हेही वाचाः एकही गाव कर्नाटकात जाणार नाही, उलट बेळगाव महाराष्ट्रात घेणार! फडणवीसांनी स्पष्टच सांगितले)

बेळगावच्या बाबत महाराष्ट्राने सौम्य भूमिका घ्यावी म्हणून त्यांनी जतवर दावा सांगितला आहे. त्यामुळे हा सगळा राजकारणाचा भाग असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

एकही गाव कुठेही जाणार नाही- फडणवीस

2012 साली जत तालुक्यातील 40 गावांनी ठराव करुन आपल्याला कर्नाटकात सामील व्हायचे असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता नव्याने कोणताही ठराव करण्यात आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील एकही गाव कुठेही जाणार नाही. इतकंच नाही तर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाबाबत लढाई लढून बेळगाव,कारवार,निप्पाणीसहित सर्व गावे मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here