शिवसेना ही शरद पवारांच्या पिंज-यातील मांजर; मनसेचे शिवसेनेला जशास तसे उत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौ-यावर आहेत. या दौ-यादरम्यान ते पक्षविस्तार आणि पक्षबांधणीसाठी वेगवेगळे निर्णयही घेत आहेत. दरम्यान राज ठाकरे यांच्यावर टीका करताना ठाकरे गटातील नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मनसे भाजपचा मित्र पक्ष होऊ पाहत आहे. तसेच, राज ठाकरे यांचा पक्ष म्हणजे भाजपची दुसरी शाखा आहे, अशी टीका केली होती. आता याच टीकेला मनसेने जशास तसे उत्तर दिले आहे.

शिवसेना ही शरद पवार यांच्या पिंज-यातील मांजर आहे. राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत आहे, त्याबद्दल शिवसेना काही बोलणार का? असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. देशपांडे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. हे आम्हाला भाजपची शाखा म्हणत आहेत. आपण स्वत: कोण आहोत हे एकदा शिवसेनेने पाहावे. शिवसेना शरद पवार यांच्या प्राणी संग्रहालयातील पिंज-यामधील मांजर झाली आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले. शिवसेनेचे संभाजीनगरमधील नेतृत्व खूप जुने झाले आहे. आम्ही आमचा पक्ष वाढवत आहोत. मात्र राष्ट्रवादी शिवसेना संपवत आहे, त्याचे काय? असा सवालही संदीप देशपांडे यांनी केला आहे.

( हेही वाचा: महापालिकेविरोधात याचिका दाखल; ठाकरे गटाची उच्च न्यायालयात धाव )

काय म्हणाले होते अंबादास दानवे?

अंबादास दानवे यांनी मनसे तसेच राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे लोकसभा निवडणुकीदरम्यान लाव रे तो व्हिडीओ म्हणून फिरत होते. तीन-चार महिन्यांपूर्वी त्यांनी भोंग्याचा विषय काढला होता. जिथे भोंगे असतील तिथे हनुमान चालीसा लावणार होते. मात्र, एकाही भोंग्यावर हनुमान चालीसा म्हटली गेली नाही, असे अंबादास दानवे म्हणाले.

राज ठाकरे महाविकास आघाडी आणि शिवसेनेला जाणीवपूर्वक विरोध करत होते. भाजपचे ते मित्र होऊ पाहत आहेत. भाजपचे लोक त्यांना भेटतात. ते भाजपच्या लोकांकडे जातात. राज ठाकरेंचा मनसे पक्ष म्हणजे भाजपची दुसरी शाखा आहे, असा टोला अंबादास दानवे यांनी राज ठाकरेंना लगावला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here