शिवसेनेतील फूटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात आता शिवाजी पार्कवर होणा-या दसरा मेळाव्यावरुन रस्सीखेच पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागण्यात आली. तर शिंदे गटाकडूनही महापालिकेला पत्र लिहिण्यात आले आहे. या दोन्ही गटांत रस्सीखेच सुरु असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या वादावर भाष्य केले आहे. वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो, हे दोन्ही गटांनी लक्षात घ्यावे, असा टोला मनसेने लगावला आहे.
शिवसेना आणि दसरा मेळावा हे अतूट नाते आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेची ओळख आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या परंपरेची सुरुवात केली होती. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठकारे हे दरवर्षी दसरा मेळाव्यात संबोधित करतात. शिवसेनेची राजकीय भूमिका या दसरा मेळाव्यातून अधिक स्पष्ट होते. त्याशिवाय भविष्यातील वाटचालीबाबतदेखील भाष्य केले जाते.
( हेही वाचा: भाजपा सिरीयल किलर, मग आप सिरीयल डीलर? )
'शिवतीर्थ'वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे ! आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे "वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो" pic.twitter.com/bkTLZaEXMm
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 30, 2022
मनसेचा टोला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना आणि शिंदे गटात सुरु असलेल्या दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत ठाकरे आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे. शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे. दोनही गटांचे त्यावरुन घमासान चालू आहे पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो, असे ट्वीट देशपांडे यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community