मुंबई महापालिका शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याच्या प्रस्ताव कोणत्याही सदस्यांना बोल न देता मंजूर करण्यावरून भाजपने केलेल्या आरोपांनंतर आता मनसेनेही महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाचे पितळ उघडे पाडले आहे. या निविदांमध्ये पात्र ठरलेल्या तिन्ही कंपन्या या एकाच समुदायातील असून सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांच्या जवळच्या माणसालाच हे टॅब देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे. या टॅबचा वापर केवळ पुस्तक म्हणून केला जाणार आहे. परंतु याआधारे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा किंवा शिक्षकांशी संवाद साधू शकणार नाही. त्यामुळे हे टॅब विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर शिवसेनेच्या मर्जीतील कंपनीला कंत्राट देण्यासाठीच खर्च केल्याचाही आरोप देशपांडे यांनी केला आहे.
सहा वेळा टॅबमध्ये बदल करण्यात आला
महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये महापालिका शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. याबाबत पत्रकार परिषद घेऊन संदीप देशपांडे यांनी हे आरोप केले. या टॅब खरेदीत टॅब पुरवणाऱ्या कंपनीला फेव्हर करणे आणि त्यात पुरवल्या गेलेल्या सुविधांबाबत अशा प्रकारे दोन घोटाळे झाल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. दहावीच्या मुलांची परीक्षा येत्या मार्चमध्ये आहे. पण त्यांना हे टॅब २० हजार टॅब मिळणार नाही. हे टॅब त्यानंतरच मिळाले तरी ते त्यांना घरी घेऊन जाता येणार नाही. ते शाळेतच वापरावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये परीक्षा देण्याची कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. ठराविक कंपनीला काम देण्यासाठी सहा वेळा टॅबमध्ये बदल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
(हेही वाचा यंदाच्या गणेशोत्सवातही पीओपीच्या मूर्ती?)
२० हजार टॅबला चार्जिंगची सॉकेट नाही
यापूर्वी जेव्हा निविदा मागवली होती, तेव्हा इ लर्निंगची सुविधा होती. पण नंतर ती काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे याचा वापर केवळ पुस्तकासारखाच होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यामध्ये ना सिमकार्ड आहे ना वायफायची सुविधा. तसेच महापालिकेच्या शाळांमध्येही वायफायची सुविधा नाही. एवढेच काय तर जे २० हजार टॅब आहे, ते चार्जिंगची सॉकेट आणि बटनही नाहीत. मग हे टॅब कसे चार्ज करणार असा सवाल त्यांनी केला. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणतात प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, पण घोटाळे करायला अक्कल लागते आणि त्याचा वापर आपण चांगले करता असाही सवाल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्र्यांना केला आहे. विरप्पन गँगप्रमाणे ही लूट सुरु आहे. ज्या तीन कंपन्या यामध्ये पात्र ठरल्या आहेत, त्या एकाच समुदायातील आहे. या समुदायातील एका शाळेचे उद्घाटन विद्यमान पर्यावरण व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले होते आणि त्याप्रसंगी ऍपर्स अँड ग्रुपचे संचालक आहेत त्यांनी आदित्य ठाकरे हे आपले जवळचे स्नेही असल्याचे म्हटले होते याचा पुरावा एक बातमी पुढे करत देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांना सादर केला.
Join Our WhatsApp Community