मनसे म्हणतेय शरद पवार-बृजभूषण सिंह ‘तेल लावलेले आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान’

92

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभा घेऊन अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा केली, त्याचवेळी आपल्याला दौऱ्याला अयोध्येत विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एनसीपी अध्यक्ष शरद पवार आणि उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियातून व्हायरल करत ‘तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांविरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे’, असे म्हटले. या फोटोने मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अयोध्या दौरा रद्द करण्याची नामुष्की ओढावल्यानंतर पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी केलेल्या आक्रमक विरोधामुळे मनसेला दौरा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. मात्र बृजभूषण सिंह यांना महाराष्ट्रातूनच रसद पुरवली गेल्याचा आरोप पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. मनसेचे सरचिटणीस सचिन मोरे यांच्यानंतर आता प्रवक्ते संदीप देशपांडे यांनीही बृजभूषण सिंह यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतचा फोटो शेअर करत निशाणा साधला आहे. या दोन्ही नेत्यांचा एकाच व्यासपीठावरील फोटो शेअर करत मनसे नेत्यांनी राज ठाकरे यांचा दौरा रद्द होण्यामागे राष्ट्रवादीचाच हात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आगामी काळात राजकारण आणखी तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(हेही वाचा काश्मीरच्या निसर्गसौंदर्याची पर्यटकांना भुरळ, तीन महिन्यांत साडेतीन लाख पर्यटकांनी दिली भेट)

काय म्हणाले बृजभूषण सिंह? 

यानंतर खासदार बृजभूषण सिंह म्हणाले, शरद पवार देशाच्या मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. महाराष्ट्र कुस्ती संघासाठी त्यांनी मोठे काम केले आहे. आम्ही कुस्तीसाठी जे काम केले, त्यासंदर्भात ते माझे कौतुक करत होते. तीन दिवसांपर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या माळा शरद पवारांसाठी येत होत्या, त्या मला घातल्या याचा मला गर्व आहे. माझे संबंध आहेत त्यांच्याशी असे बृजभूषण सिंह म्हणाले आहेत. आजही शरद पवार आम्हाला भेटले, तर मी त्यांच्याशी नजर चुकवणार नाही. मी त्यांना नमस्कार करेन. ते माझ्यासाठी एक चांगले नेते आहेत. त्यांच्याकडून राज ठाकरेंनी काहीतरी शिकायला हवे असे ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.