मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाले होते. त्यावेळी मुंबईत दादर येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानाबाहेर पोलिसांना चुकवून पसार होत असताना एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली होती. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर शुक्रवारी संदीप देशपांडे यांच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आल्याची माहिती समोर येत आहे. पण, संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी दोघेही अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
(हेही वाचा – राज ठाकरेंचा ‘वसंता’ म्हणाला, “मी नाराज नाही तर…”)
देशपांडे आणि संतोष धुरी अद्याप फरार
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप देशपांडे ज्या गाडीतून पळाले होते त्या गाडीच्या ड्रायव्हरला आज अटक करण्यात आली आहे. यासह दोन अन्य आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मुंबई पोलीस सध्या संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरीचा शोध घेत आहेत. मात्र या दोघांनीही आपले मोबाईल फोन बंद करून ठेवले असल्याने त्यांचे लोकेशन ट्रेस करण्यात अडचणी येत असल्याची पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
काय म्हणाले होते देशपांडे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर बुधवारी, ४ मे रोजी दुपारी घडलेल्या घटनेनंतर संध्याकाळी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर देशपांडे यांनी एक व्हिडीओद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी कुठेही पळून गेलेलो नाही, मात्र पोलीस चुकीच्या पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करत असल्याने सध्या कायदेशीर सल्ला घेत असून त्यानंतर मी समोर येईन, असे त्यांनी यात म्हटले आहे. त्याच बरोबर इतर आरोपांचेही त्यांनी खंडण केले आहे. माझ्या वाहनाचा धक्का लागून ज्या महिला कर्मचारी पडल्याचा आरोप पोलीस करत आहेत, तो निराधार आहे. प्रत्यक्षात त्या महिला कर्मचारी ज्या अंतरावर पडल्या त्यापासून आपली गाडी बऱ्याच अंतरावर उभी होती असे देशंपाडे म्हणाले. पोलीस निरीक्षक केशव कासार यांना आपण मला अटक करत आहात का, अशी विचारणा वारंवार करत होतो, तरीही कासार याविषयी काहीही सांगत नव्हते. मात्र मी जेव्हा गाडीतून निघायला लागलो, तेव्हा त्यांनी मला खेचण्याचा प्रयत्न केला, असेही देशपांडे म्हणाले.
Join Our WhatsApp Community