महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी शिवाजी पार्क येथे हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन संशयितांना भांडूप येथून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आता शनिवारी पत्रकार परिषद घेत संदीप देशपांडे यांनी अनेक आरोप केले आहेत.
संदीप देशपांडेंनी सांगितला घटनाक्रम
शुक्रवारी सकाळी मी नेहमीप्रमाणे माॅर्निंग वाॅकसाठी निघालो होतो. सकाळी शिवाजी पार्कच्या गेट नंबर 5 जवळ असताना माझ्यावर एका व्यक्तीने स्टम्पने हल्ला कोला. मी मागे वळून बघताच माझ्या डोक्यावर स्टम्पने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मी लगेच माझ्या उजव्या हाताने स्टम्प पकडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात दुस-या एका व्यक्तीने स्टम्पने माझ्या पायावर हल्ला केला. त्यानंतर याठिकाणी उपस्थित लोक माझ्या दिशेने धावून आल्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.
( हेही वाचा: राऊतांची जीभ पुन्हा घसरली; आता निवडणूक आयोगाला दिली शिवी )
घोटाळा बाहेर काढला म्हणूनच हल्ला
माझ्यावर कोणी हल्ला केला हे मला माहिती आहे. त्याबाबतची माहिती मी पोलिसांना दिली आहे. माझे म्हणणे मी एफआयआरमध्ये सांगितले आहे. त्यामुळे पोलीस तपास करत आहेत. ही चौकशी संपेपर्यंत मी कोणाचेही नाव घेणार नाही, असे सांगतानाच ते केवळ शिवाजी पार्कात क्रिकेट खेळायला आलेले नव्हते, त्यांचे कोच कोण आहेत ते सुद्धा पोलीस शोधून काढतील, असे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले. मी कोविड घोटाळा काढला. त्याची तक्रार केली आणि 48 तासांत माझ्यावर हल्ला झाला, असा आरोपही संदीप देशपांडे यांनी केला. मात्र, आज त्यांनी कोणावरही थेट आरोप केलेला नाही. कोणत्याही राजकीय नेत्याचे नाव घेतले नाही.
Join Our WhatsApp Community