महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा झाली. राज ठाकरेंनी या मेळाव्यात मशिदीवरील भोंग्यांबाबत विधान केले आहे. यावेळी ते म्हणाले, मशिदीवर भोंगे लावल्यास त्याच्या समोर हनुमान चालिसा लावण्यात येईल, असे म्हणत त्यांनी मनसैनिकांना आदेश दिलेत. मात्र त्यांचे हे विधान चांगलंच वादग्रस्त ठरले. यानंतर मनसेतील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर येत असल्याचे समोर आले आहे.
पुण्यात मनसेला दुसरा मोठा धक्का
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील माजीद अमीन शेख हे वॉर्ड क्रमांक 84 शाखा अध्यक्ष असून त्यांनी आता राजीनामा दिला आहे. तसेच मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलंय की, आमच्या भावना कुठे व्यक्त करायच्या? आज समाजात सामोरे जाताना जाणीव झाली. 16 वर्षांचा फ्लॅश बॅक आठवला आणि डोळ्यात पाणी आले, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच मुस्लिम पदाधिकारी बैठक घेऊन पुढील निर्णय घेतील असेही त्यांनी म्हटले आहे. तर मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनीही नाराजी बोलून दाखवली. त्यानंतर पुण्यात मनसेला दुसरा मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील माजीद अमीन शेख यांच्यानंतर पुण्यातील कोंढव्यातील मनसे वाहतूक सेनेचे उपशहराध्यक्ष शेहेबाज पंजाबी यांचा मनसेला राम राम ठोकल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा – ‘कोणी कितीही प्रयत्न केला तरी माझं नाव हटवता येणार नाही’, फडणवीसांचा थेट इशारा)
म्हणून सोपवला राजीनामा
कोंढव्यातील मनसे वाहतूक सेनेचे उपशहराध्यक्ष शेहेबाज पंजाबी यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र गारुडकरांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. राज ठाकरेंच्या ‘त्या’ भाषणानंतर मनसेला पुण्यात दुसरा धक्का बसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे नाराज झाल्याने घेतला हा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.