मनसेने सातत्याने कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेत झालेल्या घोटाळ्यासंदर्भात मविआवर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी मनसे नेते संदिप देशपांडे यांनी ठाकरे सरकारच्या काळात कोरोनादरम्यान झालेल्या भ्रष्टाचाराबाबत ठोस पुरावे हाती लागल्याचे सांगितले होते. आता याच पुराव्यांच्या आधारे मनसेने ईडीला पत्र लिहिले आहे.
काय आहे मनसेचा आरोप ?
मनसेकडून सातत्याने कोरोना काळात मुंबई महानगर पालिकेकडून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. यात कोवीड सेंटरमधील वेगवेगळ्या सेवांच्या कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सातत्याने होत आहे. मात्र, आतापर्यंत घोटाळ्यांच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी करणा-या मनसेने आता त्यासंदर्भातील पुरावा हाती आल्याचे सांगितले आहे.
काय म्हटलंय पत्रात ?
मनसेकडून आर्थिक गुन्हे शाखेच्या सह पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रामध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. कोरोना काळात पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना युवासेनेच्या पदाधिका-यांच्या माध्यमातून मोठा घोटाळा केला गेला. कोरोना काळात चौकशीची मागणी होत होती. पण कंत्राटाची चौकशी करता येणार नसल्याचे पालिकेने सांगितले होते. मनसेने सुरुवातीपासून यांसदर्भात आवाज उठवला आहे. पण यावेळी घोटाळ्याचा भक्कम पुरावा आमच्या हाती लागला आहे, असे मनसेने पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
( हेही वाचा: ‘संजय राऊतांमुळे आम्ही सुरतमार्गे गुवाहाटीला गेलो’; शिंदे गटाचा मोठा खुलासा )
कंपन्यांच्या नावांची यादी पत्रात नमूद
कोरोना काळात कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला वेगवेगळी कंत्राटे देण्यात आली. त्यात मालाड व रिचर्डसन कु़डास येथे कोरोना सेंटर्स उभारले होते. या सेंटरमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून जेवण, लाॅंड्री, सेनिटायझर पुरवठा अशी कंत्राटे युवासेना पदाधिकारी वैभव थोरात यांनी तयार केलेल्या ठक्कर अॅड पवार कंपनी, शिवसेना एंटरप्रायजेस, शिवचिदंबरम फार्मा, रमेश अॅंड असोसिएट, अर्का कंपनी, देवराया एंटरप्रायजेस, जय भवानी एंटरप्रायजेस व ग्रीन स्पेस रिएल्टी या कंपन्यांना देण्यात आले. या कंत्राटांमागे कोणाचा सहभाग होता, याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community