महाराष्ट्रात उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे मनसेचा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींपासून राज ठाकरे दूर होते. मात्र मंगळवारी सकाळी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एक पत्र आपल्या कार्यकर्त्यांसह मनसैनिकांना लिहिले आहे. या पत्रात राज ठाकरेंनी बुधवारी असणारा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले आहे. राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
(हेही वाचा – PanCard च्या 10 आकडी नंबरमधील रहस्य जाणून घ्या, होईल खूप फायदा!)
बुधवारी गुरूपौर्णिमेनिमित्त राज ठाकरेंनी मनसेचा मेळावा, संवाद कार्यक्रम सकाळी 10 वाजता आयोजित केला होता. या मेळाव्यात मुंबईतील सर्व मनसे नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष ते उपशाखाध्यक्ष, पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर मनसेतर्फे आयोजित मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे, असे एका पत्राद्वारे कळवले आहे.
काय आहे राज ठाकरेंचे मनसैनिकांना पत्र
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी,
सस्नेह जय महाराष्ट्र!
तुम्हाला जरा थोड्या तातडीनं कळवतो आहे. आपण वास्तविक उद्या एक मेळावा आयोजित केला होता. ज्यात मला तुमच्याशी बोलायचं होतं आणि कामासंबंधी काही सूचना करायच्या होत्या. परंतु कालपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसानं थैमान घातलेलं दिसत आहे. जनजीवन तर विस्कळीत आहेच, परंतु अशा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हा सर्वांना सांगणार होतो तो सांगितला तरी तो प्रत्यक्षात आणता येणं फार अवघड आहे.
अशा परिस्थितीत आपण उद्याचा मेळावा पुढे ढकलत आहोत. पुढची तारीख आणि वेळ लवकरच, थोडा पावसाचा अंदाज घेऊन, तुम्हा सर्वांना कळवली जाईलच.
दरम्यान, तुम्ही स्वतःची तर काळजी घ्याच परंतु अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतो आहे तिथेही तुम्ही लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. मुख्यतः नदीकाठाला जिथे लोक रहात आहेत तिथल्या घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. सांगली कोल्हापूरकडचा आत्ता-आत्ताचा पूर तुम्हाला आठवतोय ना? काही लोकांना तात्पुरत्या निवासात हलवायला लागू शकतं. तिथे अन्नधान्य, पिण्याचं शुध्द पाणी, अंथरूण-पांघरूण (सर्वत्र ओल असते) पुरवावं लागेल. मुख्यतः वृध्द, गरोदर महिला, अपंग आणि लहान मुलं ह्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. झाडं उन्मळून पडतात, ती नंतर पुन्हा लावावी लागतील. अशा खूप गोष्टी आहेत.
एक लक्षात घ्या की अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येईल असं काहीही करू नका.अर्थात, असं काही होऊ नये, कुठलंही नैसर्गिक संकट येऊ नये, हीच आपली इच्छा आहे, फक्त सतर्कतेसाठी सांगितलं.
लवकरच भेटू,
आपला नम्र,
राज ठाकरे
Join Our WhatsApp Communityमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांठी मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांचे पत्र.#MNSAdhikrut pic.twitter.com/oDcj7AKehu
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 12, 2022