शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. महापालिका निवडणुका तोंडावर आलेल्या असताना झालेल्या या युतीमुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेवर भाजपकडून सडकून टीका होत असतानाच आता मनसेनेही यात उडी घेतली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करत बोचरी टीका केली आहे.
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी एक ट्वीट करुन शिवसेना- संभाजी ब्रिगेड युतीवर हल्ला चढवला आहे. सत्तेविनी मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली, असे खोचक ट्वीट करुन राजू पाटील यांनी शिवसेना-संभाजी ब्रिगेड यांच्या युतीवर टीका केली आहे.
सत्तेविना मती गेली,
जो मिळेल त्याच्याशी युती केली…!#Maharashtra— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) August 26, 2022
( हेही वाचा : दर सहा महिन्यांनी आपला देश बदलणारे ‘हे’ ऐतिहासिक बेट माहितीय का? )
उद्धव ठाकरेंकडून युतीची घोषणा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी 26 ऑगस्टला पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीची घोषणा केली. आम्ही रस्त्यावरची लढाई जिंकणारच आहोत. पण खांद्याला खांदा मिळून निवडणूकही लढणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.