मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या भेटीगाठी सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे मनसे-भाजप-बाळासाहेबांची शिवसेना यांची महायुती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याचबाबत आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी सूचक विधान केले आहे. आमची सर्वांची मनं जुळलेली आहेत फक्त वरुन तारा जुळल्या की सगळं जुळून येईल, असे विधान राजू पाटील यांनी केले आहे.
काय म्हणाले राजू पाटील?
युती करायची की नाही हा निर्णय सर्वस्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आहे. त्यांनी सध्या आम्हाला स्वतंत्र लढण्याचे आदेश दिले असून त्यानुसार आम्ही तयारी सुरू केली आहे. जर राज ठाकरे यांनी भविष्यात युतीसोबत जायला सांगितलं तर आम्ही त्यासाठीही तयार आहोत. इथे आमची मनं जुळली आहेत, फक्त वरुन तारा जुळल्या की सारं काही जुळून येईल, असे विधान राजू पाटील यांनी महायुतीबाबत बोलताना केले आहे.
(हेही वाचाः रवी राणा म्हणतात, मी फडणवीसांचा सच्चा शिपाई)
विरोधक असलो, तरी शत्रू नाही
रविवारी डोंबिवलीतील फडके रोड येथे दिवाळी संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसेच्या डोंबिवली येथील शाखेला भेट दिली. याबाबत बोलताना आमदार राजू पाटील म्हणाले की, चांगल्या सणाच्या वेळी आपण कधीही आडकाठी करत नाही, तशी आपली संस्कृती नाही. श्रीकांत शिंदे हे या कार्यक्रमानिमित्त डोंबिवलीत आले होते. त्यावेळी त्यांना मनसे शहर अध्यक्षांनी कार्यालयाले भेट देण्याची विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन ते तिथे आले. जरी आम्ही राजकारणात विरोधक असलो तरी शत्रू नक्कीच नाही, असेही राजू पाटील यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community