फडणवीसांच्या ट्वीटने मिळाले भाजप-मनसे युतीचे स्पष्ट संकेत

131

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसे युतीच्या चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमधून वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपल्या ट्वीटच्या माध्यमातून पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला केल्यामुळे हे भाजप-मनसे युतीचे स्पष्ट संकेत तर नाही ना, अशी एक चर्चा पुन्हा नव्याने जोर धरू लागली आहे.

गुढीपाडवा मेळावा आणि ठाण्यातील सभेत राज ठाकरे यांनी शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर राज्यात जातीयवाद जास्त फोफावल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देताना शरद पवार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आठवण करुन दिली.

(हेही वाचाः ‘आम्ही त्या बंगल्याजवळ चप्पला सोडल्या…’; ‘सिल्वरओक’वरील हल्ल्याआधी फोनवर काय झाले संभाषण?)

370 वरील पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा देणा-या संविधानातील कलम 370चा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कडाडून विरोध केला होता. पण शरद पवार यांनी कलम ३७० बाबत त्यांच्या पक्षातील भिन्न मते फेटाळून लावल्याचा दाखला देत फडणवीसांनी पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच जातीय आधारावर समाजाचे ध्रुवीकरण करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा जूना ट्रॅक असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी द काश्मिर फाईल्स या सिनेमाबाबत केलेली वक्तव्ये ही आश्चर्यकारक नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः उद्धव आणि आदित्य ठाकरेंचा तलवार उंचावलेला फोटो दाखवत मनसेचा राज्य सरकारला सवाल! ‘आता यांचं काय?’)

इशरत जहाच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचा प्रयत्न

नवाब मलिकांना अटक होताच ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा दाऊदशी संबंध जोडला जात असल्याच्या त्यांच्या विधानाचेही त्यांनी स्मरण करुन दिले आहे. इशरत जहा ही निर्दोष असल्याचंही पवार यांनी सांगितलं होतं, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील इशरत जहाच्या मदतीसाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेखही फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये केला आहे. 2012 मध्ये आझाद मैदानातील हिंसाचारानंतर राज्य सरकारकडून कशी ढिलाई दाखवण्यात आली, रझा अकादमीला कारवाईपासून कसं वाचवण्यात आलं याचाही उल्लेख फडणवीस यांनी पवारांवर टीका करताना केलेल्या ट्वीटमध्ये केला आहे.

(हेही वाचाः कोरोनाचा कुठलाही येऊ दे अवतार, बेस्ट कर्मचारी सुरक्षितच राहणार)

हिंदू टेररचा पहिला उल्लेख करणारे पवार

संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध असताना सुद्धा पवारांनी मुस्लिम आरक्षणासाठी सातत्याने पुढाकार का केला, असा सवालही फडणवीसांनी केला आहे. अल्पसंख्यांक समाज कोणाचाही पराभव करू शकतो असे विधानही पवारांनी केले होते, अशा विधानांना आपल्या राजकारणात काही स्थान आहे का, असा सवालही त्यांनी ट्वीटमधून केला आहे. हिंदू टेरर या शब्दाचा पहिला उल्लेखही शरद पवार यांनी केल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्या विरोधात फडणवीसांनी घेतलेली ही थेट भूमिका राज ठाकरे यांच्या विधानांशी मिळतीजुळती असल्याने हे भाजप-मनसे युतीचे संकेत तर नाही ना, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

(हेही वाचाः “हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे”)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.