मनसे जनतेसमोर नव्या स्टाईलमध्ये…कोणती आहे ती स्टाईल?

136

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यांवर उतरून लोकांमध्ये सामील होत आहे. कुणी हळदी कुंकू, तर कुणी विविध कार्यक्रम आयोजित करून, तर कुणी क्रिकेट सामने आयोजित करून एकप्रकारे निवडणुकीचा प्रचार करत, सगळे झाडून मतदारांची बांधणी करत आहेत. यात आता मनसेही मागे राहिलेली नाही. पण मनसे म्हणते ‘आम्ही मत मागायला नाही, तर मत जाणून घ्यायला जात आहे.’ मनसेचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आता प्रत्येक विभागाविभागांमध्ये सार्वजनिक उत्सव मंडळ, सोसायटी, मंडळे आदीची भेट घेऊन त्यांची मते घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते, त्यातील सहा नगरसेवक फुटून शिवसेनेत सामील झाले. त्यामुळे मनसेचा एकमेव नगरसेवक उरलेला असून, त्यामुळे मुंबईतील मनसेचे अस्तित्वच लयाला गेल्यासारखे चित्र दिसत होते. परंतु आगामी निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा मैदानात उतरुन शिवसेनेने फोडलेल्या सहा नगरसेवकांचा बदला घेणार आहे. सहा नगरसेवक फोडून मनसे संपवणाऱ्या शिवसेनेविरोधात आता मनसेची खरी लढाई आहे. त्यामुळे मुंबईतील मनसैनिक आता वाड्यावस्त्यांमधून फिरु लागले आहेत.

( हेही वाचा : मुंबईकरांचा रेल्वे प्रवास होणार सुखकर! काय आहे विशेष कारण वाचा… )

मत मागायला नाही… मत जाणून घ्यायला !

मनसेचे प्रभादेवी-वरळीमधील माजी नगरसेवक संतोष धुरी यांनीही अशाचप्रकारे लोकांशी संवाद वाढवलेला आहे. विभागातील विविध मंडळे, इमारती व चाळींमध्ये ते भेट देवू लागले आहेत. मात्र आपण मत मागायला आलो नसून मत जाणून घ्यायला आलोय असे सांगतात. धुरी यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवा नेते अमित ठाकरे यांचे छायाचित्र असलेली पत्रके बनवलेली असून ज्या भागांमध्ये ते जाणार आहेत, तिथे सर्वांना कल्पना देवून ते जात असतात.

निवडणुकीसाठी मनसेची तयारी

संतोष धुरी यांनी या पत्रकांद्वारे मत मागायला नाही…मत जाणून घ्यायला! बदल हवाय…कसा, कुठे आणि कधी..? असा मथळा दिला आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, आज आपल्या भेटीला येत आहोत कारण तुमची मते जाणून घेण्यासाठी…कधी न थकता न थांबता…पुढे पुढे चालत राहायचे…असे आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक आहेत…! प्रत्येक राजकीय नेता, कार्यकर्ता, विविध मान्यवर आणि पक्षाचे पदाधिकारी ह्या सर्वांच्या अभियानाची गोष्ट म्हणजे जनसेवा..! लोकविश्वास संपादन करणे इतके सोपे झालेय का..? की अनेक मान्यवर मंडळी आपल्याला निवडणुकीपुरतेच गृहीत धरतात…आपला नगरसेवक कोण..? आमदार, खासदार कोण..? आपल्याला यांची किती मदत होते, त्यांची कामे काय आहेत या कडे आपण खूप दुर्लक्ष करतो आणि मग येते ते महाराष्ट्रावरील कोरोनाचे संकट त्या वाईट काळात आपल्याला कोणी वाली नाही हे कळते. म्हणून जागे व्हा हेच सांगू इच्छितो….

( हेही वाचा : कोरोना काळातील महापालिका रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांना लागली लॉटरी! किती मिळणार रक्कम? )

अशा बऱ्याच संकटात मग विषय कोणताही असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदू बांधवांच्या मदतीस पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. आणि नेहमीच असेल..! अशा अनेक प्रश्नांवर, समस्यावर मार्ग काढण्याबाबत चर्चा करण्यासाठी आणि बदल घडवण्यासाठी आम्ही येत आहोत आपल्या भेटीला लवकरच…असेच म्हटले आहे. त्यामुळे मनसेनेही आता निवडणुकीसाठी कंबर कसलेली असून या निवडणुकीत मनसेच्या या नव्या पावित्र्यांची जोरदार चर्चा विभागांमध्ये आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.