- विशेष प्रतिनिधी, मुंबई
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) दारुण पराभव पत्कारावा लागला. मनसेचा मुंबईसह राज्यात एकही आमदार निवडून आला नाही. मात्र, भाजपाने मैत्रीपूर्ण पाठिंबा दिल्यानंतरही मनसेचाही एकही आमदार निवडून न आल्याने भाजपावर मनसे नाराज आहे. त्यातच राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला सरकारमध्ये घेण्यात आम्हाला रस आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे सोबत घेण्याचा प्रयत्न करू असे स्पष्ट केले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसे राज्यातील सरकारसोबत जाऊन निवडणुका लढवेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनसे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत बोलतांना त्यांनी, मनसेचे (MNS) अध्यक्ष ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत खुल्या दिलाने भाजपा महायुतीला पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला चांगले यश मिळाले आहे. पण त्यांचाही पक्ष आहे. त्यांनाही निवडणुका लढवायच्या होत्या. पण विधानसभा निवडणुकीत आमच्याकडे जागा नव्हत्या. आम्ही तीन पक्ष होतो. त्यामुळे त्यांना आमच्यासोबत सामावून घेता आले नाही. म्हणून ते विरोधात लढले. प्रवाहाच्या विरोधात लढूनही त्यांच्या उमेदवारांना चांगली मते मिळाली आहेत. मनसेचे आणि विचार चांगले आहेत, आमच्या विचारांचा मेळ जुळून येत आहे. त्यामुळे त्यांना आमच्या सरकारसोबत घेण्यात रस आहेत. पण महापालिका निवडणुका म्हणून जर विचाराल तर जिथे शक्य असेल तिथे सोबत घेण्याचा प्रयत्न करू असेही फडणवीस यांनी नमूद केले. फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर मनसे आणि भाजपा यांच्यातील संबंधाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.
(हेही वाचा – Assembly ची पहिल्यांदा पायरी चढणारे नवे आमदार नक्की आहेत तरी कोण ? जाणून घ्या एका क्लिकवर…)
मात्र, भाजपाने शिवडीमध्ये मनसेचे (MNS) उमेदवार बाळा नांदगावकर यांच्यासमोर उमेदवार दिला नव्हता. तरीही शिवसेना आणि भाजपाच्या मतांच्या जोरावर नांदगावकर यांना विजय मिळवता आलेला नाही. माहीम विधानसभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांच्यासमोर शिवसेनेचे सदा सरवणकर हे यांचे आव्हान होते. या मतदारसंघात भाजपाने उघडपणे पाठिंबा देण्याची भाषा केली असली तरी प्रत्यक्षात मनसेचे अमित ठाकरे यांच्या पारड्यात भाजपाची काहीही मते पडली नाही. मनसेची सरासरी ४० हजार मते असताना अमित ठाकरे यांना केवळ सुमारे ३३ हजार मतेच पडली. त्यामुळे मनसेला स्वत:चीही पूर्ण मते घेता आलेली नाही आणि भाजपाने हवा निर्माण करूनही त्यांची मते मनसेला मिळाली नाही. तसेच वरळी विधानसभेत मनसेचे (MNS) उमेदवार संदीप देशपांडे यांचा मार्ग सुकर करण्यासाठी शेवटच्या क्षणाला मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघात भाजपाची मते मनसेला मिळतील अशी शक्यता होती. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही.
महायुतीत शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युतीधर्म पाळून आपली मते दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराकडे जाणार नाही याची काळजी घेतली आणि मनसे भाजपाच्या मतांवर अवलंबून राहत विजयाची स्वप्ने पाहत राहील. त्यामुळे मनसेला (MNS) विधानसभेत यश मिळाले नाही. त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शक्य असेल तिथे सोबत घेण्याचा प्रयत्न केला जाईल असे विधान केल्यानंतर मनसे पक्ष महापालिका निवडणुकांमध्ये त्यांच्यासोबत जाईल का याबाबतच प्रश्न उपस्थित केला जात आहे. उबाठा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे हे भाजपाच्या हातातील खेळणे असल्याची टीका केली. राज ठाकरेंना भाजपा खेळवत ठेवतात, असे ते म्हणाले. राज ठाकरे यांच्या पक्षाने काय करावे हे आता देवेंद्र फडणवीस ठरवत असल्याचीही टीका राऊत यांनी राज ठाकरेंवर केली.
(हेही वाचा – मी केवळ हिंदू मतांवर निवडून आलोय; Nitesh Rane यांचा संजय राऊतांना हल्लाबोल)
दरम्यान, शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेसोबत युती करावी किंवा करू नये किंवा अन्य कुणासोबत युती करावी याचा निर्णय पक्षाचे मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे वरिष्ठ नेते एकत्र बसून घेतील, असे स्पष्ट केले. लोकसभेत मनसेने (MNS) महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्यांचा फायदा महायुतीला झाला. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने मनसेला मदत केली आणि शिवडीमध्ये महायुतीचा उमेदवार तिथे दिला गेला नव्हता, असेही स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community