‘करारा जवाब मिलेगा…’, मनसेकडून राज ठाकरेंच्या उत्तर सभेचा टीझर तयार

123

गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर घेतलेल्या सभेत राज्यातील अनेक मुद्द्यांवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्याचा मुद्दा उचलला. त्यावरुन त्यांच्यावर सत्ताधा-यांकडून जोरदार टीका करण्यात आली. याच टीकांना उत्तर देण्यासाठी आता राज ठाकरे यांची 12 एप्रिल रोजी ठाण्यात सभा होणार आहे. या सभेला मनसेकडून उत्तरसभा असे नाव देण्यात आले असून, त्याचा धमाकेदार टीझरही मनसैनिकांकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे.

(हेही वाचाः राज ठाकरेंची ‘या’ तारखेला होणार ‘उत्तरसभा’)

राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणात राज्यातील मशिदींवरील भोंगे राज्य सरकारने हटवले नाहीत तर त्यासमोर हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले होते. त्यांच्या या आवाहनाला मनसैनिकांकडून राज्यात अनेक ठिकाणी प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्यात आली. त्यामुळे दोन समाजांत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत असल्याचा आरोप सत्ताधा-यांकडून करण्यात आला.

(हेही वाचाः Mosque Loudspeaker Row: राज ठाकरेंच्या सभेआधीच मनसेच्या कार्यालयावर दगडफेक)

उत्तर सभेचा टीझर

त्यांच्या याच आरोपांना सडेतोड उत्तर देण्यासाठी राज ठाकरे मंगळवार 12 एप्रिल रोजी ठाण्यात सभा घेणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात येत आहे. करारा जवाब मिलेगा, असे म्हणत या उत्तर सभेचा खास टीझर मनसैनिकांकडून व्हायरल करण्यात येत आहे. त्यामुळे या हाय व्होल्टेज सभेकडे आता अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

उत्तर सभेत देणार प्रत्युत्तर

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत हा टीझर शेअर केला आहे. यामध्ये अजित पवार, शरद पवार, संजय राऊत यांनी केलेल्या टीकांना राज ठाकरे आपल्या उत्तर सभेत प्रत्युत्तर देणार असल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या भोंग्यांवरील विधानाला विरोध करताना इतके दिवस झोपले होते का, असे म्हटले होते. तर संजय राऊत यांनी शिवतीर्थावरचा भोंगा हा भाजपचा भोंगा असल्याची टीका केली होती.

(हेही वाचाः निवडणुकीवर डोळा ठेऊन अशी भाषणं करणं परवडणार नाही, अजितदादांचा राज ठाकरेंना टोला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.