अनेक अपयश पचवून राज ठाकरे पुन्हा फॉर्ममध्ये आले होते, ते ’लाव रे तो व्हिडिओ’ ही टॅगलाईन घेऊन. या टॅगलाईन अंतर्गत राज ठाकरेंनी भाजपावर खूप टीका केली. अगदी एका भाषणात तर त्यांनी ’भक्तांना घरात घुसून मारा’ असंही म्हटलं होतं. मनसे कार्यकर्ते भाजपाच्या समर्थकांना मारहाण करत होते, तो हाच काळ. राज ठाकरे यांचे शनिवारचे भाषण ऐकले तर लाव रे तो व्हिडिओचा सूर एकदम बदललेला आहे. हा सूर का बदलला? २०१४ मध्ये त्यांनी मोदींची स्तुती केली होती, मग पुढे त्यांच्यावर टीका केली. आता ते पुन्हा भाजपाला जे हवे आहे तसेच का बोलत आहेत? याचा आपण विचार केला पाहिजे.
मनसेला कसलाच फायदा झाला नाही
राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी मनसेची स्थापना केली. सुरुवातीला मनसेला यश मिळालं पण नंतर मनसेने फारशी चांगली कामगिरी केली नाही. मनसेकडून कुणाला काही फायदाही होणार नाही म्हणून कॉंग्रेस व राष्ट्रवादी मनसेचा विचार करणार नव्हतीच. भाजपा – शिवसेनेची युती होती आणि त्यात मनसे प्रवेश करु शकत नव्हती. राज साहेबांनी आम्ही एकटे लढणार असं कितीही म्हटलं तरी त्यांना एका मोठ्या पक्षाची साथ हवीच आहे. म्हणून ’लाव रे तो व्हिडिओ’ ही टॅगलाईन गाजवण्यात आली. पण ऐन वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मनसेकडे ढुंकूनही पाहिलं नाही. भाजपा आणि मोदींवर टीका करणार्या भाषणांमुळे मनसेला कसलाच फायदा झाला नाही. पहिली गोष्ट मनसे हा शिवसेनेप्रमाणेच उजवा पक्ष आहे. तर राजकारणामध्ये आपण कोणावर टीका करावी याचं एक गणित असतं. एखादा उजवा पक्ष दुसर्या उजव्या पक्षावर पराकोटीची टीका करत असेल, तर टीका करणार्या पक्षाच्या वाट्याला काय येणार? याचा फायदा राष्ट्रवादीलाही तसा झाला नाही.
त्यानंतर राज्याची सगळी गणिते बदलली आणि भाजपा-शिवसेना एकत्र लढूनही शिवसेनेने राष्ट्रवादी व कॉंग्रेससोबत संसार केला. पहिला लेख ’राज ठाकरे यांना नामी संधी’ या लेखात मी म्हटलं होतं की उद्या जर मध्यवर्ती निवडणूका लागल्या तर राज ठाकरेंनी सरळ महायुतीत सहभागी व्हावं. शिवसेनेइतक्या जागा त्यांना जागा वाटपात भाजपा देणार नाही पण ती त्यांच्या पक्षासाठी नवसंजीवनी ठरेल. ज्यावेळी राज ठाकरे व फडणविसांची भेट झाली, त्यावेळी मी लिहिलं होतं की मनसे भाजपा निवडणूकीपूर्वी प्रत्यक्षात युती होणार नाही पण भाजपाने मनसेला लढण्यासाठी बळ दिलं तर शिवसेनेची ताकद कमी होऊ शकते. ’आज पाहिलंत तर हे सरकार पूर्णपणे अडकत चाललंय. सरकारच्या मंत्र्यांवर आरोप होत आहेत. नुसते आरोप नव्हे तर पुराव्य़ांसह अटक होत आहे. परमवीर, वाझे, देशमुख, मलिक आणि अशा अनेक समस्या या सरकारने स्वतःसाठीच निर्माण केल्या आहेत. घोडचुकांची मालिका या सरकारने रचली आहे.
राज ठाकरेंच्या भाषणातील काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.
१. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जातीयवाद वाढला.
२. मलिक, भुजबळ आणि महाविकासआघडीतल्या इतर नेत्यांवर टीका.
३. मशिदिंसमोर हनुमान चालीसा लावा.
४. राज ठाकरेंच्या या सभेत एका अमराठी माणसाचं भाषण.
५. मुख्यमंत्री व्हायचं होतं, मग आता भोगा.
( हेही वाचा: मोफत घरांमुळेच झोपडपट्ट्या वाढल्या, लोंढे वाढले! राज ठाकरेंची टीका )
ती चूक राज ठाकरे करणार नाहीत
हे ५ मुद्दे खूप जास्त महत्वाचे आहेत. सर्वात पहिला मुद्दा, लाव रे तो व्हिडिओवरुन राष्ट्रावादीला कव्हर करणार्या राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि शरद पवार साहेबांवर खोचक टीका केली. राष्ट्रवादीमुळे जातीयवाद वाढला हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला खुपणारासुद्धा आहे. म्हणूनच जितेंद्र आव्हाडांनी लगेच यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे यापुढे आपण कोणाच्या विरोधात लढणार आहोत, हा मुद्दा राज ठाकरेंनी स्पष्ट केला आहे. त्यांना महाविकास आघाडीच्या विरोधात लढायचं आहे. बंगालमध्ये कॉंग्रेसने सत्ताधारी ममता दिदींच्या विरोधात नव्हे तर बंगालच्या राजकारणात कुठेच नसलेल्या भाजपाविरोधात निवडणूक लढवली आणि तोंडावर आपटले. त्यातही भाजपने ममता दिदीना हरवलं नाही म्हणून भोळे कॉंग्रेसजन खुश दिसले. ही चूक राज ठाकरे करणार नाहीत हे त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केलं.
…आणि तुम्ही फसता
सोशल मीडियावर असा सूर उमटला होता की पवार साहेबांनी हिंदूंच्या मतांमध्ये फुट पाडण्यासाठी राज ठाकरेंना आणलं आहे, जेणेकरुन निवडणूकीत भाजपची मते फुटतील. पहिली गोष्ट मनसे भाजपाचे नव्हे तर केवळ शिवसेनेचीच मते स्वतःकडे वळवू शकते. हीच मनसेची क्षमता आहे. राज ठाकरेंनी ठरवलं तर मनसे भविष्यात शिवसेनेची जागा घेऊ शकते. आणि याचसाठी तर हिंदुत्वाचा अट्टाहास केलेला आहे. तर हा पवार साहेबांचा डाव आहे असं मी अजिबात मानत नाही. दुसरा मुद्दा महाविकास आघाडीतल्या भ्रष्टाचारी नेत्यांवरील टीका. भुजबळ हे भ्रष्टाचाराच्या आरोपात आत होते आणि त्यांना मंत्री केलं हा मुद्दा राज ठाकरेंनी मांडला आहे. यावेळी राज ठाकरेंचा जनतेला उद्देशून असा सूर होता की हे लोक तुम्हाला फसवत राहतात आणि तुम्ही फसतात. त्याचबरोबर २०१९ ला जनतेने युतीला मते दिली या मुद्द्यावरही त्यांनी जोर दिला. यातून उद्धव ठाकरे यांनी जनतेला फसवलं हे त्यांना दाखवून द्यायचं होतं.
मुख्यमंत्री व्हायचं होतं मग आता भोगा
तिसरा मुद्दा मशिदीसमोर हनुमान चालीसा लावा. भाजपा बीएमसी निवडणूकीत शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न करेल. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हा मुद्दा मुद्दाम काढला आहे. अशाप्रकारची वक्तव्ये कै. बाळासाहेब ठाकरे करायचे. आता बाळासाहेब नाहीत तर त्यांचा खरा वारसदार जनताच ठरवेल अशा हेतूने केलेलं हे स्टेटमेंट आहे. त्यांनी मुद्दाम बेहरामपाड्याचा उल्लेख केला. मातोश्रीपासून बेहरामपाडा जवळ आहे. शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेरण्याचा हा प्रयत्न आहे. चौथा मुद्दा राज ठाकरेंच्या सभेत एका हिंदी भाषिक व्यक्तीचं भाषण झालं. राज ठाकरेंना हा संदेश द्यायचा आहे की आता उत्तर भारतीय यांच्याशी असलेलं वैर मी संपुष्टात आणलं आहे आणि आता आपल्याला हिंदू म्हणून एकत्र यायचं आहे. हे हिंदी भाषण प्रतिकात्मक होतं आणि याचा अचूक परिणाम झाला आहे. हे परिणाम लगेच दिसून येणार नाहीत, इतकंच. पाचवा मुद्दा मुख्यमंत्री व्हायचं होतं, मग आता भोगा असं म्हणत उद्धवजी ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधलेला आहे. आता भोगा! या शब्दात खूप मोठा अर्थ दडलेला आहे. या सरकारमध्ये असलेल्या घटकांना काय काय भोगावं लागेल याची जाणीव राज ठाकरेंना आहे. याआधी संजय राऊतांना एकांतात बोलण्याचा सल्ला राज ठाकरेंनी दिला होता. त्या वाक्यालाच धरुन केलेलं हे विधान आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय भूमित पाय रोवायचेत
आता सोशल मीडियावर जो सूर उमटला आहे की पवारांनी राज ठाकरेंना पाठवलं आहे, तर मला हे मुळीच पटत नाही. राज ठाकरेंनी आपला सूर परिस्थितीनुसार बदललेला आहे. हिंदूत्व हाती घेतल्यानंतर त्यांना अशा प्रकारचं भाषण करणं गरजेचं होतं. बाबासाहेब पुरंदरेंचा उल्लेख करुन त्यांनी ब्रिगेडवरही निशाणा साधला आहे. आता हे भाषण ऐकल्यावर काही लोकांचं म्हणणं आहे की भाजपा – मनसे युती होईल. ती युती केव्हाच झालीय. ही आतल्या आत केलेली युती आहे, लाव रे तो व्हिडिओ सारखी. भाजपा – मनसे बीएमसीमध्ये उघडपणे युती करणार नाही. उलट ज्या जागेवर भाजपा जिंकणार नाही अशी जागा मनसेला दिली जाईल, म्हणजे भाजपा आपला दुबळा उमेदवार तिथे उभा करेल. शिवसेनेला घेरायचं असेल तर भाजपाला मनसेची मदत लागणार आहे. पण मनसेसोबत थेट युती करण्याची भाजपाला सध्या तरी गरज नाही. मनसेला तर भाजपाची नितांत गरज आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण त्यांना आता महाराष्ट्राच्या राजकीय भूमीत पाय रोवायचे आहेत. केवळ भाषणांना होणार्या गर्दीमुळे पक्ष चालत नाही तर निवडणूकीत चांगला परफॉमन्स द्यावा लागतो, सत्ता स्थापन करावी लागते, याची जाणीव राज ठाकरेंना आहे.
तर सत्ताधारी पक्षांत मनसे असेल
राज ठाकरे आपल्या मुद्द्यांवर ठाम राहिले आणि सातत्य ठेवलं तर शिवसेनेची जागा नक्कीच घेऊ शकतात. लक्षात ठेवा, मनसे ही भाजपाची जागा घेणार नाही. आता दोघे हिंदुत्ववादी पक्ष असले तरी दोन्ही पक्षाचा स्वभाव भिन्न आहे. शिवसेना आणि मनसेचा स्वभाव एकसारखा आहे. आज शिवसेनेची राज्यात मतांच्या गणितांच्या बाबतीत जी स्थिती आहे, तशी किंवा साधारण त्या आसपासची स्थिती मनसेची काही वर्षांनंतर होऊ शकते. पण वर सांगितल्याप्रमाणे मुद्यांवर ठाम असणे व सातत्य असणे हे दोन गुण मनसेला आत्मसात करावे लागणार आहेत. बीएमसीमध्ये चांगलं प्रदर्शन झालं व भाजपच्या ताब्यात बीएमसी आली तर कदाचित, यदा कदाचित २०२४ मध्ये महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षांत मनसेचा सहभाग असू शकतो. राज ठाकरेंच्या कालच्या भाषणाचा हा अर्थ आहे.
लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Join Our WhatsApp Community