मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः न्यायालयात जाऊन वॉरंट रद्द करून यावे अन्यथा आम्हाला न्यायालयाच्या आदेशावर काम करावे लागणार असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
काय आहे प्रकरण
सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचा खटला सांगली जिल्हा न्यायालयात सुरु आहे. राज ठाकरे यांना या गुन्ह्यात जामीन मिळालेला असला तरी न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याला राज ठाकरे हे हजर राहत नसल्यामुळे सांगली जिल्हा न्यायालयाने ६ एप्रिल रोजी राज ठाकरे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट बजाविण्यासाठी मुंबई पोलिसांकडे पाठविण्यात आले होते.
न्यायालयाच्या आदेशाचे पोलिसांकडून अद्याप पालन नाही
न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना राज ठाकरे यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यास सांगितले होते. न्यायालयाने बजावलेल्या अजामीनपात्र वॉरंट बजाविण्याची शेवटची तारीख काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे, मात्र मुंबई पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाचे अद्याप पालन केलेले नाही.
(हेही वाचा – वसंत मोरेंच्या कट्टर शिलेदाराचा ‘मनसे’ला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’!)
याबाबत पत्रकारांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना प्रश्न विचारला असता ‘आम्हाला न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट मिळाले आहे, आम्ही त्याच्यावर काम करणार आहोत, आम्ही राज ठाकरे यांना याबाबतची कल्पना दिलेली असून ते स्वतः न्यायालयात जाऊन वॉरंट रद्द करू शकतात, अन्यथा आम्हाला न्यायालयाच्या आदेशावर काम करावे लागणार असल्याचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.
Join Our WhatsApp Community