पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरेंनी केले आवाहन! म्हणाले, “जो उमदेपणा भाजपाने दाखवला, तोच उमदेपणा मविआ नेत्यांनी …”

165

आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुका होत आहेत. यासाठी भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. परंतु या निवडणुका बिनविरोध कराव्यात असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्र लिहित सर्व पक्षीयांना केले आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

महाराष्ट्र विधानसभेच्या दोन आमदारांचे नुकतंच दुखद निधन झालं. या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होत तेव्हा. तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशा वेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एका उमद्या राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला दिलेली श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असे नाही.

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या. त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान केल होत. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत त्यानी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली. आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभामध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला, तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वांना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दु:खद घटनामुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.