राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, म्हणाले, “ही बढती आहे की अवनती…”

144

गुरूवारी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. गुरूवारीच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. या नंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करणारे पत्र लिहिले आहे.

(हेही वाचा – राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले ‘हे’ २ महत्त्वाचे सल्ले)

या पत्रामध्ये राज ठाकरेंनी फडणवीसांचे अभिनंदन केल्याचे पाहायला मिळत आहे. यासह त्यांनी पक्षाचा आदेश मानून फडणवीस यांनी उममुख्यमंत्री पदाचा स्वीकार केला याबद्दल कौतुकच…मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा केल्याने फडणवीसांनी आपल्या या वर्तनातून राज्यातील सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासमोर आदर्श ठेवला आहे, अशी मार्मिक टिप्पणी करत राज यांनी फडणवीसांनी केलेल्या त्यागाचे कौतुक केल्याचे या पत्रात पाहायला मिळाले.

असे आहे राज ठाकरेंचे पत्र

श्री. देवेंद्र फडणवीस उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!

प्रिय देवेंद्रजी,

सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो…

तुम्ही ह्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून, पक्षादेश शिरसावंद्य मानून उप-मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरच अभिनंदन!

आता जरा आपल्यासाठी

ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे.

एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिध्द केलेलंच आहे त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुमचं मनःपूर्वक अभिनंदन!

आपला मित्र,
राज ठाकरे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.