नवी मुंबईतील विमानतळालाही शिवरायांचेच नाव दिले जावे! राज ठाकरेंची भूमिका 

विमानतळ लवकरात लवकर उभे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी नावावर वाद सुरु करणे, हे दुर्दैवी आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

127

नवी मुंबईत उभारण्यात येत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मूळ मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचाच भाग असणार आहे. त्यामुळे मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. तेच नाव नवी मुंबईतील विमानतळालाही दिले जाईल. जेव्हा महाराजांचे नाव येईल, तेव्हा विरोध आपोआप संपुष्टात येणार आहे, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.

शिवरायांच्या नावाला विरोध नसेल!

नवी मुंबईतील विमानतळाला शिवरायांचे नाव दिल्यावर त्याला कुणाचाही आक्षेप नसेल. खुद्द भाजपचे नवी मुंबईतील आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी चर्चा झाली, तेव्हा त्यांनी विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याविषयी आग्रही भूमिका घेतली होती. त्यावेळी आपण त्यांना शिवरायांचे नाव दिल्यास तुमची काय भूमिका असेल, असे विचारल्यावर तेव्हा आमदार ठाकूर यांनी ‘जर शिवरायांचे नाव येईल, तेव्हा आमचा विरोध संपेल’, असे त्यांनी म्हटले असल्याचेही राज ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा : मुंबईतील निर्बंधांबाबत महापालिकेचे नवे आदेश! कसे असणार निर्बंध?)

शिवरायांच्या नावासमोर दुसरे कुणाचे नाव असू शकत नाही!

महाराजांच्या नावावर चर्चा होऊच शकत नाही. स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जरी आज असते, तर त्यांनीही विमानतळाला शिवरायांचेच नाव द्यावे, असे म्हटले असते. शिवरायांच्या नावासमोर दुसरे कुणाचे नाव असू शकत नाही. विमानतळाला नाव देणे, हा केंद्र सरकारचा अधिकार असतो, त्यामुळे आधी हे विमानतळ लवकरात लवकर उभे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी नावावर वाद सुरु करणे, हे दुर्दैवी आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

२४ जूनला आंदोलन होणारच! – आगरी-कोळी युथ फाऊंडेशन 

नवी मुंबईचे विमानतळ हे मुंबई विमानतळाचा विस्तार आहे, ही तांत्रिक बाब बाळासाहेबांचे नाव विमानतळाला सूचवताना सनदी अधिकाऱ्यांच्या लक्षात कशी आली नाही? हे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचाच विस्तार असतानाही बाळासाहेबांचे नाव सूचवले जात असेल तर आमचा देखील दि.बा. पाटलांच्या नावाचा आग्रह कायम राहील. तसेच दि.बा. पाटलांच्या नावासाठी येत्या 24 तारखेला आंदोलन करण्यात येईल, असे संकेत आगरी-कोळी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी दिले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.