आज शुक्रवारपासून देशभरात दिपावलीचा उत्सव पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्राचे लक्ष शिवाजी पार्कवरील दीपोत्सवाकडे लागले आहे. कारण शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सवासाठी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केले आहे. येत्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावेळी मनसे आणि भाजपची युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या सगळ्या राजकीय घडामोडीदरम्यान, दीपोत्सवासाठी मुंबईकर आणि दादरवासियांना राज ठाकरेंनी पत्राच्या माध्यमातून आवाहन केले आहे.
(हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारचा ‘मविआ’ला धक्का, आता CBI ला तपासासाठी परवानगीची गरज नाही)
राज ठाकरेंनी दादर आणि मुंबईकरांच्या नावाने लिहिलेल्या पत्रात त्यांनी मनसेच्या दीपोत्सवाला शिवाजी पार्कवरील शेजाऱ्यांनी आणि समस्त दादरकरांनी उपस्थित रहावे, अशी विनंती राज ठाकरेंनी केली आहे. 21 ऑक्टोबरपासून 8 नोव्हेंबर असा दीपोत्सव मनसेकडून साजरा करण्यात येणार आहे. यावेळी मुंबईकरांनीही आमच्या आनंदात सहभागी व्हावे, अशी विनंती राज ठाकरेंनी केली आहे.
काय म्हटले राज ठाकरेंनी पत्रात…
माझ्या शिवाजीपार्क शेजाऱ्यांनो
तसंच समस्त दादरकर आणि मुंबईकर जनहो,
सस्नेह जय महाराष्ट्र!
दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसू लागला आहे. गेली काही वर्ष कोरोनामुळे दिवाळी थोडी झाकोळलेली होती, परंतु यावेळेस दिवाळीच्या निमित्ताने वातावरणात पुन्हा उत्साह, आनंद दिसतोय.
दिवाळी आणि शिवतीर्थ परिसरातली रोषणाई, म्हणजेच ‘दीपोत्सव’ हे गेल्या १० वर्षापासून जणू समीकरणच बनलं आहे. दरवर्षी आपण शिवतीर्थावर, तिथल्या रस्त्यांवर, झाडांवर रोषणाई करतो. कोरोनाच्या २ वर्षांत सुध्दा आपण त्या परंपरेत खंड पडू दिला नव्हता. यावर्षी देखील आपण ही रोषणाई करून दिवाळीचा आनंद साजरा करणार आहोतच. त्या दीपोत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी हे पत्र लिहितो आहे.
दीपावलीच्या निमित्ताने आपण आपलं घर, आपलं अंगण आणि आपला परिसर दिव्यांनी उजळवून टाकतो. दादर मधील हा शिवतीर्थाचा परिसर, हे मी माझ्या घराचं अंगणच समजतो, म्हणून हे अंगण तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि सहभागानं विविध रंगी लखलखणाऱ्या दिव्यांच्या रोषणाईनं आणि इतर सजावटीनं आपण उजळवून टाकणार आहोत. मला तर वाटतं की प्रत्येकानं आपल्या घराबरोबर आपलं अंगण आणि आपला परिसर असाच सुंदर ठेवला तर महाराष्ट्र जगाला हेवा वाटेल असा होईल. हे करण्यामागेही माझी तीच भावना आहे.
वसुबारसेपासून, २१ ऑक्टोबर २०२२ पासून ते तुळशीच्या लग्नापर्यंत, ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत, हा दीपोत्सव साजरा होणार आहे. यावर्षी वसुबारसेला म्हणजे २१ ऑक्टोबरला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपण दीपोत्सवाचं उद्घाटन करणार आहोत. आपण अवश्य यावे, आपल्या कुटुंबातील सर्वांना घेऊन या. मित्र मंडळींना सांगा. आनंद आपण एकट्याने साजरा करत नाही. त्यात जितकी आप्त, मित्रमंडळी सहभागी होतील तितका त्या सोहळ्याचा आनंद वाढत जातो. तुम्ही तर याच, पण इतरांनाही आवर्जून सांगा.
आपल्या सर्वाचा,
राज ठाकरे
Join Our WhatsApp Communityनिमंत्रण दीपोत्सवाचं…. आनंद आपण एकट्याने साजरा करत नाही. त्यात जितकी आप्त, मित्रमंडळी सहभागी होतील तितका त्या सोहळ्याचा आनंद वाढत जातो. शिवाजीपार्कवरील आपल्या दीपोत्सवाला तुम्ही तर याच, पण इतरांनाही आवर्जून सांगा.#शिवाजीपार्कदीपोत्सव #ShivajiParkDipotsav pic.twitter.com/2k5t7N8Wus
— Raj Thackeray (@RajThackeray) October 21, 2022