वीज, घरे, पाणी अशा मूलभूत गोष्टी फुकट वाटल्या जाऊ शकत नाहीत. असा प्रकार करणाऱ्यांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान होत असल्याची टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी नागपुरात केली.
(हेही वाचा – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प वादावर राज ठाकरेंचा हल्लाबोल, स्पष्टचं म्हणाले…)
विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी सोमवारी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आम आदमी पार्टीतर्फे (आप) दिल्ली व पंजाबमध्ये दिल्या जाणाऱ्या मोफत विजेबाबत विचारले असता ठाकरे म्हणाले की, स्वातंत्र्योत्तर काळात आजवर भारतीय समाजाने कधीही अमुक एक गोष्टी फुकट हवी म्हणून मोर्चा काढलेला नाही. राजकीय पक्ष आपल्या क्षणिक फायद्यासाठी असे प्रकार करताना दिसतात. परंतु, अशा गोष्टींचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर दुरगामी परिणाम होतात. फुकटच्या रेवड्यांमुळे कुणाचेही भले होत नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
राज्यातील जनतेने नेते आणि पक्षांना धडा शिकवावा
यावेळी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना ठाकरे म्हणाले की, जनमताचा कौल, मतदान याची अवहेलना राजकीय पक्षांनी करू नये. महाराष्ट्राच्या जनतेने कुणाला कौल दिला होता हे सर्वांनाच ठाऊक आहे. अगदी जाहीर सभेत देखील पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असे सांगितले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे गप्प बसलेत. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर त्यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाचा मुद्दा बाहेर काढला. बाळासाहेबांच्या काळात जेव्हा युती ठरली तेव्हा ज्याच्या जागा अधिक त्याचा मुख्यमंत्री हे स्पष्ट होते. त्यावेळी भाजपने कधीही मुख्यमंत्री पदाची मागणी केली नव्हती. परंतु, उद्धव यांनी राजकीय गोंधळ घातल्याचा टोला राज यांनी लगावला. राज्यातील जनतेने असे नेते आणि पक्ष यांना धडा शिकवावा असे आवाहन राज यांनी यावेळी केले.
Join Our WhatsApp Community