अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी पुण्याचे माजी मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे हे तिरूपती बालाजी आणि कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी गेले होते. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर वसंत मोरे मनसे आणि राज ठाकरेंवर नाराज असल्याच्या चर्चा रंगत होत्या, मात्र वसंत मोरे दोन दिवसांनी पुण्यात आल्यानंतर त्यांनी माध्यमांना आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले वसंत मोरे?
संपूर्ण पक्ष पुण्यात होता. त्यामुळे पक्षाचे नेते असतील, नवीन शहराध्यक्ष असेल. एखाद्या लढाईला एखादा सेनापती नसला म्हणून कुणी लढाई हरत नाही, अशी प्रतिक्रिया मनसे नेते वसंत मोरे यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत असताना ते असेही म्हणाले की, दरवर्षी मी अक्षय्य तृतीयेच्या दरम्यान बालाजीला जात असतो. मागील दोन वर्ष कोरोनामुळे जाता आले नाही. मार्च-एप्रिलनंतर मी निवडून येईल आणि बालाजीला जाईन म्हणून जवळपास दीड महिने आधीच रिझर्वेशन केले होते. ठाण्याच्या सभेला राज ठाकरेंनी स्वतः बोलावल्यामुळे नाही म्हणता आले नाही. घरचा हळदीचा कार्यक्रमही त्यामुळे बाजूला ठेवला. जर ठाण्याच्या सभेला गेलो नाही, तर संभ्रम निर्माण होईल, म्हणून मी तिथे गेलो, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे कोणताही गैरसमज नसावा, असे त्यांचे म्हणणे होते. यादरम्यान, सगळे मनसे नेते संपर्कात होते त्यामुळे मी नाराज नाही, तर केवळ शांत आहे आणि सध्या मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्या व्यवसायाकडे लक्ष देत आहे.
(हेही वाचा – राज ठाकरेंच्या ‘वसंता’ने अखेर सोडले मौन; म्हणाले, “साहेबांच्या आदेशानंतर…”)
… आणि मी राजमार्गावरंच राहणार
पुढे ते असेही म्हणाले, माझा प्रभाग उपनगरामध्ये मोडतो, याठिकाणी भोग्यांच्या प्रश्नी सर्व सुरळीत सुरू आहे. आमच्या प्रभागात हनुमान चालीसा पठण झाली नाही. मी जरी इथे नसलो तरी माझे मनसैनिक सज्ज होते, असे ते म्हणाले. रस्ता चुकतोय या स्टेटसवरही त्यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले की, मी राजमार्गावर आहे आणि राजमार्गावरंच राहणार आहे. तुम्ही माझ्या स्टेटसमधील खालचे दोन वाक्य वाचले पण सुरूवातीचे वाक्य तुम्ही घेतले नाही, त्यामुळे तुम्हाला तसे वाटत असेल. सध्या मी पक्षाचे १३ वर्ष काम करुन थकलो आहे, सध्या मी अस्वस्थ नसून मी शांत असल्याचे ते म्हणाले
Join Our WhatsApp Community