औरंगाबादेत जमावबंदी नाही, राज ठाकरेंच्या सभेबद्दल काय म्हणाले पोलीस आयुक्त?

92

येत्या १ मे रोजी औरंगबाद येथे मनसेकडून भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला पाच दिवस बाकी असताना अद्याप औरंगाबाद पोलिसांनी या सभेसाठी मनसेला परवानगी दिलेली नाही. दरम्यान, औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू केल्याचे सांगितले जात होते. या आदेशानंतर सभेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. दरम्यान, औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आल्याचे वृत्त चुकीचे असल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली.

काय म्हणाले पोलीस आयुक्त?

औरंगाबादमध्ये मंगळवारपासून ९ मेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांवर दाखवण्यात आले होते. हे वृत्त चुकीचे असल्याचे औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सांगितले आहे. प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी याबाबत माहिती दिली. औरंगाबाद पोलिसांनी केवळ मुंबई पोलीस अॅक्ट अन्वये आदेश जारी केला आहे. असे आदेश वर्षभर काढले जात असतात. ही चुकीची माहिती आहे. कलम १४४ अंतर्गत कोणताही आदेश काढण्यात आलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, नागरिकांच्या हालचाली, काठ्या आणि शस्त्र बाळगणे यावर आम्ही लक्ष ठेवत असतो, असे निखिल गुप्ता यांनी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानंतर सांगितले.

(हेही वाचा- राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेची खास निमंत्रण पत्रिका तयार; भगवे वस्त्र, हनुमान अन्…)

कोणत्याही सभेमुळे किंवा कारणांमुळे कलम १४४ अंतर्गत हे आदेश काढले जात नसून हा नियमित आदेश असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. राज ठाकरेंच्या सभेसंदर्भात बोलताना ते म्हणाले, राज ठाकरेंच्या मराठा सांस्कृतिक मंडळात होणाऱ्या सभेला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्याबाबत निर्णय झाल्यानंतर पोलिसांकडून अधिकृतरित्या याबाबत माहिती देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

राज ठाकरेंच्या सभेचा टीझर प्रदर्शित

मनसेकडून १ मे रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या ट्विटरवर हा टीझर प्रदर्शित केला आहे. टीझरसोबत ‘चला संभाजीनगर’ असे कॅप्शनदेखील देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.