मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळमध्येही ते बैठका घेणार आहेत. दरम्यान, सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी शरद पवारांवर चांगलाच हल्लाबोल केला. जात या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरेंनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ साली झाली तेव्हापासून राज्यात जातीचं राजकारण सुरू झाल्याचे राज ठाकरेंनी अधोरेखित केले आहे.
काय म्हणाले राज ठाकरे
शरद पवार तेव्हा कधीच शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचे नाहीत. ‘फुले-शाहू-आंबेडकर’ हा विचार आहे, असे शरद पवार सांगतात. मग ‘शिवाजी महाराज’ हा विचार नव्हता का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. मूळ विचार हा शिवरायांचा आहे. परंतु, शिवरायांचे नाव घेतले की मुस्लिम मते जातात, म्हणून नाव घेणे टाळले जाते, इतर समाज आणि मराठा समाजात फूट पाडायची म्हणजे हेही खिशात आणि तेही खिशात असे, राष्ट्रवादीने राजकारण केले असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले.
(हेही वाचा – आता ७/१२ उताऱ्यावर ‘QR’ कोड; आधारच्या धर्तीवर मिळणार ‘युनिक’ क्रमांक)
पुढे ते म्हणाले, शिवरायांचे नाव घेतले तर मुस्लिम मते जातात. त्यामुळे कोणत्या तरी टोळ्या फंडिग गोळा करण्यासाठी उभ्या केल्या जातात. १९९९ पासून महाराष्ट्रात हे विष कालवलं गेले, असा दावाही राज ठाकरे यांनी केला. तर राहुल गांधींनी वीर सावरकरांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, राहुल गांधींना सावरकरांचा विषय काढण्याचा काही संबंध होता का… कोणीही उभे राहतं आणि काहीही बोलते. त्याला तुम्ही नको ती प्रसिद्धी देत असता, त्यामुळे हे घडतंय, असा आरोप राज ठाकरेंनी केला.
Join Our WhatsApp Community