महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे आणि त्यांची सून मिताली ठाकरे काही दिवसांपूर्वीच आई बाबा झाल्याची माहिती माध्यमातून समोर आली. राज ठाकरेंच्या सूनबाई मिताली ठाकरे यांना काही दिवसांपूर्वीच पुत्ररत्न झाले आहे. त्यामुळे सध्या ठाकरे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. हा आनंद अमित ठाकरेंनी सगळ्यांसोबत शेअर करण्यासाठी आपल्या लाडक्या बाळासोबतचा एक गोड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेला हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘शिवतीर्था’वरील ‘बाळ’ ठाकरेंची पहिली झलक तुम्ही पाहिली का? नसेल तर नक्की बघा…
(हेही वाचा – अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढणार?)
अमित ठाकरेंच्या बाळाची पहिली झलक
अमित ठाकरे यांनी बाळाचा फोटो शेअर केल्यानंतर त्यावर लाईक्सचा वर्षाव होत असून सगळेच या गोंडस बाळाचे कौतुक करत आहेत. अमित ठाकरे यांच्या बाळाचे नामकरण अद्याप झालेलं नसल्याने या नव्या राजकुमाराचं नाव नेमकं काय असणार याचीही उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
5 एप्रिलला झालं छोट्या पाहुण्याचं आगमन
अमित ठाकरे यांची पत्नी मिताली ठाकरे यांनी ५ एप्रिल २०२२ रोजी बाळाला मुंबईतील ब्रीच कँन्डी हॉस्पिटलमध्ये जन्म दिला होता. दरम्यान बाळाच्या जन्मानंतर अमित ठाकरे यांनी नुकतंच फेसबुकवर त्याच्यासोबतचा पहिला फोटो शेअर केला आहे. हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट असून यात बाळाने अमित ठाकरेंची करंगळी हातात घट्ट पकडल्याचे दिसत आहे. या फोटोत बाळाचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी फोटो बाळाच्या जन्मानंतर रुग्णालयातच काढल्याचे फोटोवरून दिसून येत आहे.
२०१९ साली अमित-मिताली अडकले विवाह बंधनात
मिताली ठाकरेंचे सासर आणि माहेर मुंबई असल्याने बाळाचा जन्म देखील मुंबईत होणार आहे. अमित ठाकरे यांचा विवाह २७ जानेवारी २०१९ रोजी मिताली बोरुडे यांच्याशी झाला. अमित यांच्या लग्नाला राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. लोअर परळ येथील सेंट रेजिस या आलिशान हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला होता.