महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज शनिवारी दुपारी लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. कोरोनाची लागण झाल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती आणि ती उद्या रविवारी होणार असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरेंवर उद्या हिप बोनची शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे आजच दुपारी ते काही चाचण्यांकरता रूग्णालयात दाखल होणार आहेत. या शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांना दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.
(हेही वाचा – आता मोनो रेल्वेतून उतरताच महालक्ष्मी रेल्वे स्टेशन गाठता येणार!)
…म्हणून शस्त्रक्रिया गेली लांबणीवर
यापूर्वी देखील राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया करण्याची तारीख देण्यात आली होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात ते रूग्णालयात दाखल देखील झाले होते. पण त्यांच्या शरीरात कोरोनाच्या डेड सेल्स आढळून आल्याने त्यांना भुलीचे इंजेक्शन देणे शक्य नव्हते. म्हणून ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.
टेनिस खेळताना राज ठाकरेंच्या पायाला दुखापत
हे दुखणे वाढल्यामुळे मे महिन्यातला आपला पुणे दौरा अर्धवट सोडून राज ठाकरे मुंबईत परतले होते. ५ जून रोजी होणारा अयोध्या दौरासुद्धा याच कारणामुळे स्थगित करावा लागला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी टेनिस खेळत असताना राज ठाकरेंच्या पायाला दुखापत झाली होती. हीच दुखापत पुन्हा एकदा बळावली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार उद्या लिलावती रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडेल.