राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा; कुणाचा फायदा, कुणाला तोटा?

154

राज्यात एकीकडे पक्ष, चिन्ह आणि ‘खोके-ओके’वरून वादंग निर्माण झाला असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. मात्र, या घोषणेमुळे नक्की कुणाचा फायदा होणार आणि कुणाला तोटा, याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

( हेही वाचा : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेट! केंद्र सरकारने जाहीर केला ७८ दिवसांचा बोनस)

एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यापाठोपाठ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यामुळे भाजपा आणि मनसेची युती होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, मंगळवारी झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज यांनी स्वबळाचा नारा देत, या चर्चा गौण ठरवल्या. यापूर्वी जी विधाने आणि बातम्या माध्यमांत आल्या, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. आपण स्वबळावरच निवडणुका लढवणार आहोत. सध्याच्या घडामोडींमुळे शिवसेनेला सहानुभूती मिळतेय, हा भ्रम आहे. या घाणेरड्या राजकारणाला पर्याय म्हणून मतदार आपला विचार करतील. त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचा, अशी सूचनाही त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केली.

असे असले, तरी राज्यभरातील सध्याची ताकद आणि कार्यकर्त्यांची फळी पाहता मनसेचा स्वबळाचा निर्णय भाजपाच्या पथ्थ्यावर पडण्याची अधिक शक्यता आहे. मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. त्यासाठी मनसेसोबत थेट युती केल्यास उत्तर भारतीय मतदार काही प्रमाणात दुरावू शकतात. ही बाब लक्षात घेऊन भाजपा आणि मनसेने छुपी युती केली आहे का, अशाही चर्चा यानिमित्ताने रंगू लागल्या आहेत.

मराठी मतांची फुट अटळ

मनसेचे राजकारण हे मराठी माणसाभोवती फिरते. त्यामुळे मनसे ताकदिनीशी निवडणुकीत उतरल्यास मराठी मतांची मोठी फुट अटळ आहे. उद्धव ठाकरे गटाला त्याचा सर्वाधिक फटका बसेल. शिंदे गट बाजूला झाल्यामुळे आधीच पक्षाला भगदाड पडले असताना, मनसेने जोरदार प्रहार केल्यास उद्धव ठाकरेंची पुरती कोंडी होईल, अशा चर्चा आहे.

उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी संधान बांधल्यापासून राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाचा नारा बुलंद केला आहे. त्यानंतर शिवसेनेतून उठाव करताना शिंदे गटानेही हिंदुत्त्वाची री ओढल्यामुळे राज यांना प्रतिस्पर्धी तयार झाला असला, तरी प्राप्त परिस्थितीत भाजपा-मनसे-शिंदे गटाच्या समिकरणात हिंदू मतांची फारशी फाटाफुट होणार नाही, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.