मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदीवरील भोंगे उतरविण्यासंदर्भात ३ मेपर्यंत मुदत दिली होती. असा अल्टिमेटम दिला असतानाही पुण्यात अनेक मशिदींवर भोंगे दिसत आहेत. त्यामुळे ते लवकर काढण्यात यावे, यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, शिष्टमंडळामधील पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यामध्ये संवाद दिसला नाही. त्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, “एकला चलो रे असलो, तरी मी पक्षातच आहे. मी पक्षाच्या बाहेर नाही,”. यावेळी खुद्द वसंत मोरे यांनी स्वत:हून उघडपणे नाराजी देखील व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
मला टाळलं जातंय, म्हणत व्यक्त केली नाराजी
मनसेच्या पुणे शहराध्यक्ष पदावरुन हटविण्यात आल्यानंतर वसंत मोरे यांना पक्षात टाळले जात असल्याचे मंगळवारी पुन्हा एकदा पाहायला मिळाले. त्यावर खुद्द वसंत मोरे यांनी स्वत:हून उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. पक्षात शहर पातळीवर मला टाळलं जात आहे. त्यामुळे आता राज ठाकरे येतील तेव्हाच मी पक्ष कार्यालयात जाणार, असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – तुम्ही सरकारी कर्मचारी आहात? मग तुम्हाला मिळणार ‘हा’ लाभ!)
माझं उद्दिष्ट, ध्येय पक्ष वाढविणे हेच आहे
पुढे वसंत मोरे असेही म्हणाले की, मी सुरुवातीपासून सांगत आलो आहे की, राज साहेब ठाकरे विचारांचा अथांग महासागर आहे. त्याला अनेक नद्या, नाले येऊन मिळतात. त्यातील काही खळखळणारे असतात. यातील मी एकजण आहे. तसेच माझी सुरुवातीपासून वाट वेगळीच राहिलेली आहे. माझं उद्दिष्ट, ध्येय पक्ष वाढविणे हेच राहिले आहे. माझ्याकडे तीन प्रभागांचे नियोजन दिल्यास मी ९ नगरसेवक निवडून आणले आणि जेव्हा शहराध्यक्ष पदाची धुरा माझ्याकडे होती. त्यावेळी शहरात मनसेचे २५ नगरसेवक निवडून येतील असे ध्येय ठेवले असल्याचे त्यांनी म्हटले.