मनसेच्या उत्तरसभेत जेम्स लेन पुन्हा चर्चेत आला, राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे जातीयवादी आहेत, असा आरोप करत एनसीपीच्या स्थापनेनंतर शिवरायांवरून राजकारण सुरु केले. त्यासाठी बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट बनले. पवार म्हणतात बाबासाहेब पुरंदरे यांनी जेम्स लेनला माहिती पुरवली, हा जातीयवाद नाही का, असा सवाल केला. त्यावर शरद पवार यांनी त्याला प्रत्युत्तर देत जेम्स लेनने पुरंदरे यांचा नावाचा उल्लेख त्याच्या पुस्तकात केला आहे, त्यामुळे पुरंदरेंवर टीका करणे यात आपल्याला गैर वाटत नाही, असे म्हटले. गुरुवारी, १४ एप्रिल रोजी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याचा पुराव्यासह खुलासा करत आता शरद पवार यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.
मनसेने दाखवले पुरंदरेचे पत्र
बाबासाहेब पुरंदरे यांनी जेम्स लेनने शिवरायांविषयी लिहिलेल्या मजकुराचा विरोध करत एक सडेतोड पत्र ऑक्सफोर्ड विद्यापीठाला पाठवले. हे पत्र एका शिवप्रेमीने मनसे संदीप देशपांडे यांना दिले. या पत्रात बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की, ज्यांच्यावर कोट्यवधी भारतीयांचे प्रेम आहे, त्यांच्याबद्दलचे निराधार आरोप आम्ही सहन करणार नाही. जेम्स लेन यांनी त्यांच्या पुस्तकात हेच केले आहे. हे पुस्तक तुमच्याकडून प्रकाशित होत आहे. शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेवांविषयी जेम्स लेनने जे विधान केले, ती त्याच्या घाणेरड्या मनोवृत्तीची उत्पत्ती आहे. त्यामुळे प्रकाशक आणि लेखकांनी २५ नोव्हेंबर २००३ पर्यंत कोट्यवधी भारतीयांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागावी आणि हे पुस्तक भारत आणि परदेशातूनही मागे घ्यावे. जर प्रकाशक आणि लेखकाने असे काही केले नाही, तर भारत सरकारने या पुस्तकावर बंदी घालावी आणि त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती आम्ही करू, असे या पत्रातून बाबासाहेब पुरंदरे आणि इतर इतिहासकारांनी ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला सांगितल्याचे संदीप देशपांडे म्हणाले. त्यामुळे शरद पवारांनी हे पत्र बघावे. जर त्यांना वाटले की चूक झाली आहे, तर महाराष्ट्राची त्यांनी माफी मागितली पाहिजे, असेही देशपांडे म्हणाले.
(हेही वाचा शरद पवार शिवरायांचे नाव कधी घेत नाहीत! राज ठाकरेंचा गंभीर आरोप)
काय म्हणाले होते शरद पवार?
जेम्स लेनसंदर्भात राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शरद पवारांनी त्यावर बुधवारी बोलताना भूमिका मांडली आहे. जेम्स लेनने केलेल्या लिखाणात त्याचा आधार म्हणून बाबासाहेब पुरंदरेंकडून ही माहिती घेतली असे म्हटले होते. एखाद्या लेखकाने गलिच्छ प्रकारचे लिखाण केले आणि त्याला माहिती देण्याचे काम पुरंदरेंनी केले. त्याचा खुलासा पुरंदरेंनी कधी केला नाही. म्हणून त्यांच्यावर टीका-टिप्पणी केली असेल, तर मला त्याचे दु:ख वाटत नाही, तर अभिमान वाटतो. त्यामुळे याबाबत कुणी काय म्हटले असेल, तर मला त्याबद्दल फारसे बोलायचे नाही, असे पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community