मनसेच्या संदीप देशपांडेंना राऊतांची काळजी, पत्र लिहित दिला असा सल्ला

164

उध्दव ठाकरे यांच्या तत्कालिन शिवसेनेचे नेते आणि राज्य सभा सदस्य संजय राऊत यांच्याकडून मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारचे आरोप तसेच बेताल वक्त्तव्य केली जात आहेत. त्यामुळे मूळ शिवसेनेचे नेते तसेच भाजपचे नेतेही राऊत यांना गंभीरतेने घेत नाही. त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याची टिकाच केली जात आहे. त्यातच आता मनसेचीही भर पडली असून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राऊत यांना पत्र लिहून पत्रकार परिषदेपूर्वी किमान दहा ते पंधरा मिनिटे आधी मेडिटेशन करत जा असा सल्ला दिला आहे. नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर पवार…पवार….असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल, अशी भीतीही व्यक्त केली आहे.

( हेही वाचा : आशिष शेलारांनी शिवसेनेच्या ‘त्या’ निर्णयाचा असा घेतला बदला)

संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना लिहिलेल्या पत्राची सुरुवात, हे येडंxx मला का पत्र लिहतंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण विश्वास ठेवा वा ठेवू नका पण तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजी पोटीच हे पत्र लिहीत असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चिडचिड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चिडचिड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. माणूस अटेंशन सिकींग होतो. तुम्ही कितीही नाकारलंत तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी, अशा शब्दांत काळजी व्यक्त केली आहे.

आपण रोजच्या रोज ज्या पत्रकार परिषद घेता त्या ऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या, मग हळू हळू आठवड्यातून एकदा घ्या, असं करता येईल का ते जरूर पाहा आणि ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या अगोदर किमान दहा ते पंधरा मिनिटे मेडिटेशन करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल, असाही सल्ला दिला.

सर्वात महत्वाचं म्हणजे आपणच सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांच्या नादी लावलं आहे आणि त्यामुळेच शिवसेना हातून गेली ही सल मनाला लावून घेतली आहे, ती पहिली आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच ह्या ऱ्हासाला जबाबदार नाहीत. उद्धव साहेब आणि आदित्य साहेब सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत हे लक्षात घ्या. नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर पवार…पवार….असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल. कधी काळी तुमचा आणि माझा पक्ष भिन्न असला तरी आपल्यात व्यक्तिगत संवाद होता. ममत्व होते. त्याच काळजीपोटी हा पत्रप्रपंच ! पटलं तर घ्या…नाही पटलं तर चू xx आहे असं म्हणून विसरून जा ! असे या पत्राच्या मजकुरात देशपांडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे देशपांडे यांचे पत्र राऊत किती मनावर घेतात आणि स्वत:मध्ये बदल करतात हे याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.