राज्यामध्ये मार्चपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील जनता पुरती हैराण झाली असून, ७०.०३ टक्के लोकांनी लॉकडाऊन हटवावा अशी मागणी केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोशल मीडियावर सर्वेक्षण घेतले होते.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी केलेल्या सर्व्हेचा कौल जाहीर करण्यात आला असून, अनेकांनी लॉकडाऊन हटवावा अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे ८९.३ जणांनी लॉकडाऊनमुळे नोकरीवर परिणाम झाल्याचे मत नोंदवले आहे. मनसेने समाजमाध्यमांवरून विविध मुद्द्यांवर सात दिवसांत नागरिकांचा कौल जाणून घेतला. यामध्ये ५४ हजार १७७ नागरिकांनी या सर्वेक्षणात विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर आपली मते नोंदवली.
असा आहे सर्वे
लॉकडाउनच्या काळात नोकऱ्या आणि उद्योगधंद्यांसाठी सरकारकडून योग्य मदत मिळाली नसल्याचे ८४.९ टक्के जणांनी सांगितले आहे. तर राज्य सरकारने शिक्षणाबद्दल घेतलेला निर्णय योग्य नसल्याचे ५२.४ टक्के जणांनी म्हटले आहे. तसेच शालेय शुल्काबाबत सरकारी धोरणांची अंमलबजावणी होत नसल्याचे ७४.३ टक्के जणांनी म्हटले आहे. तर लोकलसेवा पूर्ववत व्हावी असे ७३.५ टक्के लोकांचे मत आहे. लॉकडाऊनच्या काळात मदत वेळेत आणि योग्य मिळाली नसल्याचे ६०.२ टक्के जणांनी सांगितले. तर वीज बिलांबद्दल समाधानी नसल्याचे ९०.२ टक्के जण म्हणाले. लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरी थांबूनच काम करत होते, याबद्दल ६३.६ टक्के जणांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काय आहे सर्वेक्षणाचा कौल?
1. लॉकडाऊन पूर्णपणे संपुष्टात आणला पाहिजे का?
होय – 70.3 टक्के
नाही – 26 टक्के
माहिती नाही – 3.7 टक्के
2. लॉकडाऊनचा तुमच्या नोकरी/उद्योगधंद्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे का?
होय – 89.8 टक्के
नाही – 8.7 टक्के
माहिती नाही – 1.5 टक्के
3. लॉकडाऊनच्या काळात आपल्या बुडालेल्या नोकरी/उद्योगधंद्यासाठी राज्य सरकारकडून योग्य मदत मिळाली आहे का?
होय – 8.7 टक्के
नाही – 84.9 टक्के
माहिती नाही – 6.4 टक्के
4. राज्य सरकारने तुमच्या मुलांच्या शिक्षणाबाबत घेतलेला निर्णय योग्य आहे का?
होय – 32.7 टक्के
नाही – 52.4 टक्के
माहिती नाही – 14.9 टक्के
5. शालेय शुल्काबाबत सरकारी धोरणांची अंमलबजावणी होत आहे का?
होय – 10.3 टक्के
नाही – 74.3 टक्के
माहिती नाही – 15.4 टक्के
6. लोकल रेल्वेसेवा आणि एसटी सेवा पूर्ववत सुरु झाली पाहिजे का?
होय – 76.5 टक्के
नाही – 19.4 टक्के
माहिती नाही – 4.1 टक्के
7. लॉकडाऊनच्या काळातील वीज देयकाबद्दल आपण समाधानी आहात का?
होय – 8.3 टक्के
नाही – 90.2 टक्के
माहिती नाही – 1.5 टक्के
8. लॉकडाऊनच्या काळात तुम्हाला वैद्यकीय मदत वेळेत आणि योग्य मिळाली आहे का?
होय – 25.9 टक्के
नाही – 60.7 टक्के
माहिती नाही – 13.4 टक्के
9. या संपूर्ण काळात मुख्यमंत्र्यांनी घरातच बसून केलेल्या कामकाजाबद्दल आपण समाधानी आहात का?
होय – 28.4 टक्के
नाही – 63.6 टक्के
माहिती नाही – 8 टक्के