म्हणून, पंढरपुरात मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा!

मनसे आजारपण वा अपघातात विरोधी पक्षाच्या सदस्याचे निधन झाल्यास, संबंधित ठिकाणी निवडणूक न लढवण्याचे मनसेचे धोरण आधीपासूनच ठरलेले आहे. तसेच मनसे त्यावेळी निधन झालेल्या व्यक्तीच्या घरच्या उमेदवारांना पाठिंबा देते.

95

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने, राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना पाठिंबा देऊ केला आहे. मनसेचे राज्य सचिव दिलीप धोत्रे यांनी ही माहिती दिली. मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त पाठिंबाच जाहीर केलेला नाही तर, मनसेचे नेते मतदारसंघात फिरुन भगीरथ भालके यांचा प्रचारही करणार आहेत. त्यामुळे राज्यात मनसे आणि राष्ट्रवादीचे समीकरण जुळले, अशी चर्चा सुरू झाली आहे.

काय आहे मनसेचे तत्त्वं?

आजवरचा मनसेचा इतिहास पाहिला तर मनसे आजारपण वा अपघातात विरोधी पक्षाच्या सदस्याचे निधन झाल्यास, संबंधित ठिकाणी निवडणूक न लढवण्याचे मनसेचे धोरण आधीपासूनच ठरलेले आहे. तसेच मनसे त्यावेळी निधन झालेल्या व्यक्तीच्या घरच्या उमेदवारांना पाठिंबा देते. हेच तत्व डोळ्यासमोर ठेऊन मनसेने पंढरपूर येथे देखील राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर होणारी पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे.

(हेही वाचाः मुख्यमंत्री अशी करणार लॉकडाऊनची घोषणा!)

याआधीही उमेदवार दिला नव्हता

गोल्डन मॅन म्हणून ओळख असलेले मनसेचे आमदार रमेश वांजळे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर
राष्ट्रवादीने त्यांच्या पत्नीला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देत उमेदवारी दिली. मात्र यावेळी देखील मनसेने स्वतःची हक्काची जागा असताना, रमेश वांजळे यांच्या पत्नी विरोधात उमेदवार उभा न करणे हीच रमेश वांजळे यांना श्रद्धांजली असल्याचे सांगत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला.

राणेंना देखील पोट निवडणुकीत पाठिंबा नाकारला

नारायण राणे आणि राज ठाकरे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. घट्ट मैत्री असून देखील राज ठाकरे यांनी वांद्रे पूर्व येथील पोट निवडणुकीत राणेंना पाठिंबा न देता, शिवसेना उमेदवार तृप्ती सावंत यांना पाठिंबा दिला होता. उमेदवाराचे आपत्कालीन निधन झाल्यास, विरोधी पक्षाला पाठिंबा देणे हे आमच्या धोरणांशी प्रतारणा केल्यासारखे होईल, असे राज यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.