मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आता जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे मुंबई महापालिका निवडणुका मनसे, भाजप आणि शिंदे गटाशी हातमिळवणी करुन लढवणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. पण आता याबाबत मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार असून मुंबईतील सर्व जागांवर मनसे उमेदवार देणार असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे.
(हेही वाचाः वेदांता-फॉक्सकॉनवरील वादावरुन मोदींचा शिंदेंना फोन, म्हणाले…)
मनसेचा स्वबळाचा नारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेल्या उठावानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेतील आपली सत्ता टिकवणे हे उद्धव ठाकरे गटासाठी मोठे आव्हान असणार आहे. तसेच मराठी मते मिळवण्यासाठी भाजपकडून मनसेसोबत युती करण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत होती. पण अखेर मनसेने या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. राज ठाकरेंच्या आदेशानुसार, मुंबईतील सर्व 227 जागांवर मनसे स्वबळावर लढेल. आम्ही स्वतंत्र आहोत, सध्यातरी आमचा कुणासोबत जाण्याचा निर्णय झालेला नाही, असंही देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.
चर्चांना उधाण
काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या बंगल्यावर गणपती बाप्पाचे दर्शन घेतले होते. त्यामुळे भाजप,मनसे आणि शिंदे गट एकत्र येऊन निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे सांगण्यात येत होते.
Join Our WhatsApp Community