मागील ४-५ दिवसांत राज्यातील एक पक्ष राहिला नाही, ज्यांनी मला ऑफर दिली नाही, इतके काम मनसेचा नगरसेवक म्हणून मी केले, म्हणून माझी चर्चा सुरू झाली, अशी जाहीर कबुली देत, जर संपूर्ण राज्याची सत्ता राज ठाकरे यांच्या हाती दिली, तर मनसेच्या कार्यकर्त्यांचा किती सन्मान होईल, याचा विचार करा, असे मनसेचे नेते वसंत मोरे म्हणाले.
ठाण्यातील मनसेच्या उत्तरसभेत वसंत मोरे यांनी सर्वांच्या आधी भाषण केले. दोन वर्षांच्या काळापासून कोरोनाने आपल्या तोंडाला मुसक्या लावल्या होत्या, शिवजयंतीपासून या मुसक्या निघाल्या. आपण सगळ्यांनी परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. पुण्यात कोरोना काळात सरकार, महापालिका काम करत नव्हती, पण मनसे काम करत होती. मनसेचे पदाधिकारी रस्त्यावर होते. सरकार मागे पडत होते, तेव्हा मनसेने दवाखाने उभे केले. जसा कोरोनाचा ट्रेंड बदलत गेला, तसे बँक, फायनान्सवाले लोकांना त्रास देऊ लागले, अशा वेळी मनसे मदतीला आली.
(हेही वाचा आधी माझ्या ‘वसंता’ला बोलू द्या! राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेत पुण्याला मान)
ब्लु प्रिंटनुसार कामे केली
वर्षभरापासून राज ठाकरेंच्या प्रकृतीत अडचणी सुरु आहेत. काल भेटलो तरी त्यांचा त्रास दिसला, तरीही पुण्याला राज ठाकरे आले तेव्हा कितीही त्रास झाला तरी ते कार्यकर्त्यांना भेटत राहिले. पुण्यात आम्ही ब्लु प्रिंटनुसार काम केले आहे, ते पाहायचे असेल तर कोंढव्यात येऊन बघा, साईनाथ बाबर आणि मी दोनच मनसे नगरसेवकांची चर्चा सुरु आहे. पुरस्कार देण्याची वेळ आली तेव्हा मनसेच्या २ नगरसेवकांची नावे चर्चेत आली. १६ वर्षांत १६ गार्डन निर्माण करणारा मी एकमेव नगरसेवक आहे. जेव्हा चर्चेतील चेहरा म्हणून मला पुरस्कार दिला, तेव्हा चंद्रकांत पाटील म्हणाले तुम्ही भाजपमध्ये या, तेव्हा मी म्हणालो, १५ वर्षे मी भाजपच्या नगरसेवकाला पाडून जिंकलो आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची कामे जनतेसमोर आणली पाहिजे, असे मोरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community